उदयनराजेंची टोल नाक्यावर एंट्री ! प्रशासन हतबल, चार तास वाहनांना टोल-फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:42 PM2017-10-05T22:42:58+5:302017-10-05T22:44:38+5:30
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली.
पाचवड (जि. सातारा) : साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली. ही वार्ता समजताच कार्यकर्ते धडक मारल्याने पुण्याजवळील खेड-शिवापूरचा टोलनाकाही टोल फ्री करण्यात आला.
त्याचे झाले असे... आनेवाडी टोलनाक्यावरील प्रशासन बदलल्याच्या पार्श्वभूमीवर साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अचानक टोल नाक्यावर दोनशे कार्यकर्त्यांसह एंट्री मारली. त्यानंतर त्यांनी टोल वसुली बंद करीत सर्व वाहने टोल फ्री केली. त्यामुळे टोल नाक्यावर काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चार तासांहून अधिक वेळ वाहने फ्री सोडण्यात आली.
आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलणार अशी चर्चा गेले महिनाभर सुरू आहे. टोल वसुलीचे अधिकार अशोका स्थापत्य कंपनीकडून काढून घेत कोल्हापूर येथील मॅक्रोलाईन कंपनीकडे देण्यात आले. यापार्श्वभूमीवर उदयनराजे टोल नाक्यावर पोहोचले. त्यांना पाहून टोलनाक्यावरील व्यवस्थापनही खडबडून जागे झाले. ‘मी इथे तोडफोड करण्यासाठी आलो नाही. मला मारायचं असेल तर मारा. पण मानहानी सहन करणार नाही. माझे किती नुकसान व्हायचे ते होऊ दे, मी त्याला भीत नाही. माझ्या लोकांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही व होऊ देणार नाही. अजूनही मी संयम ठेवून आहे.’ असे टोलनाका व्यवस्थापनाला सुनावल्यानंतर उदयनराजेंनी सर्व वाहने टोल न घेताच सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर काहीवेळातच टोल व्यवस्थापनाने वाहने टोल न घेताच सोडण्यास सुरुवात केली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे टोलनाका व्यवस्थापन गांगरून गेले. उदयनराजे टोलनाक्याच्या मधोमध उभे होते. सुमारे अडीच तास त्यांनी टोलनाक्यावर तळ ठोकला. त्यानंतर ‘इथून हलू नका, मी अर्ध्या तासात परत येतोय, मग बघू काय करायचे ते,’ असे कार्यकर्त्यांना सांगून मोटारीने ते साता-याकडे रवाना झाले.
खेड-शिवापूर टोलनाकाही झाला फ्री
खासदार उदयनराजेंनी आनेवाडी टोलनाका टोल फ्री करण्यास भाग पाडल्यानंतर काहीवेळातच खेड-शिवापूरचा टोलनाकाही टोल फ्री करण्यात आला.
सीसीटीव्ही केले बंद
आनेवाडी टोलनाक्यावर सर्व वाहने फ्री सोडण्यात येण्यापूर्वी टोलनाक्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर तेथे उपस्थित असणा-यांना आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शुटिंग करण्यासही मनाई करण्यात आली. उदयनराजेंचे कार्यकर्ते कोण फोटो काढतेय का? यावर लक्ष ठेवून होते.
‘इनकमिंग’ बंद झाल्यामुळे पवार साहेबांच्या गाडीत
‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे उडविली. सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.