उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 06:07 PM2018-06-16T18:07:30+5:302018-06-16T18:28:52+5:30
‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
सातारा : ‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी शनिवारी दुपारी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आगमन झाल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसण्यापूर्वीच शर्टचे कॉलर उभे केले. मिश्कीलपणे हसून आम्हीही आता काही कमी नाही, हे त्यांनी दाखवून दिले.
सातारा पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करतच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंच्या सोबत असलेल्या मटकावाल्यांचा समाचार घेतला. उदयनराजेंच्या गाडीमध्ये मटकेवाले आणि खंडणीखोर फिरत असतात. हे कोणाला दिसत नाही. त्यांच्याजवळ नेहमी असणारा अशोक सावंत याचे आणि साता-याचे काय संबंध आहेत. त्याला एवढा साता-याचा पुळका कशासाठी, कुठलेही काम असो, अशोक सावंत तेथे असतोच, तडजोड करून नेत्यांपर्यंत पोहोच करण्यासाठीच तो नेत्यांसोबत असतो, अशी चर्चा आहे. जिल्ह्यातील, शिरवळ, लोणंद, वाई आणि सातारा या एमआयडीसीमध्ये चांगले कारखाने आले नाहीत, याला सर्वस्वी उदयनराजे आणि त्यांची दशहत जबाबदार आहे.
अजिंक्यतारा बँकेचे विलिनीकरण होऊ नये म्हणून उदयनराजेंकडूनच दबाव आणला जात होता. दमदाटी, शिवीगाळ असे अनेक प्रकार त्यांनी केले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी बँकेचे विलिनीकरण झाले. आम्ही एकाही ठेवीदाराचे पैसे बुडविले नाहीत. तुमच्या पोटात एक आणि ओठात एक असते.
पोवई नाक्यावर उड्डाणपूल होणार होता. मात्र, या ठिकाणी उड्डाणपूल बसत नसल्यामुळे शेवटी ग्रेड सेपरेटरचा निर्णय घेण्यात आला. हे काम छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असतानाच प्रस्तावित होता. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे काम मार्गी लावले. उदयनराजेंचा संबंध केवळ नारळ फोडण्यापुरताच आहे, अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.
मी खलनायक तर तुम्ही प्रेम चोप्रा...
खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे खलनायक असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी खलनायक आहे, ठीक आहे; पण तुम्ही बिनदाढीचे प्रेम चोप्रा आहात. मी सारखं अमोल पालेकरच्या भूमिकेत राहणार नाही, असाही टोला शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला.