उदयनराजे केवळ ‘हवा बदल’साठी साताऱ्यात
By admin | Published: November 18, 2016 11:06 PM2016-11-18T23:06:31+5:302016-11-18T23:06:31+5:30
सातारा नगरपालिका निवडणूक : शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे यांच्यात कलगीतुरा; दररोजच आरोप-प्रत्यारोप सुरू...
शहरात काही दिवस का होईना राहण्याचा शिवेंद्रसिंहराजेंचा सल्ला
सातारा : ‘साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे सहा-सहा महिने साताऱ्यात नसतात. हवा बदलीसाठी कधीतरी साताऱ्यात येतात. त्यांनी आमच्याप्रमाणे किमान साताऱ्यात काही दिवस राहावे, म्हणजे त्यांना सातारकरांना नेमकं काय हवंय, हे समजेल,’ अशी जहाल टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्यात नेमकी निवडणूक कोणती आहे? पालिकेची, मार्केट कमिटीची की साखर कारखान्याची, याचा प्रश्न सर्वांनाच पडलाय, कारण सलग दहा वर्षे मनोमिलन असल्याने त्यांनी तोंड बंद ठेवले होते. आता पुन्हा मनोमिलन तुटल्याने त्यांनी कारखाना, मार्केट कमिटी, अजिंक्य उद्योग समूहाविषयीची तुणतुणं सुरू केलंय. उदयनराजेंनी खरंतर नगरपालिका निवडणूक आहे म्हटल्यावर शहराविषयी बोलावं. मात्र, पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमध्ये त्यांचा फार सहभागच नसल्याने सातारकरांचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शहरातल्या समस्या समजायला आधी त्यांनी साताऱ्यात राहायला पाहिजे. निवडणुकीपुरते साताऱ्यात यायचे आणि गायब व्हायचं, त्यांचं नेमकं वास्तव्य साताऱ्यात किती असते, हा संशोधनाचा विषय आहे,’ अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.
उदयनराजेंच्या कंपूची साताऱ्यात दहशत कशा प्रकारे आहे, हे सांगताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात येणाऱ्या उद्योजकांना कोण दमबाजी करतं, याबाबत मी उघड बोललो; मात्र उदयनराजेंचे कोठेही नाव घेतले नाही तरीही त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाण्याचं कारण काय? बिल्डर, ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून, गरवारे वॉल गु्रप, महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकांना बोलावून दमदाटी केली जाते. लोणंद, खंडाळा एमआयडीसीतील उद्योजकांना कोणाच्या नावाने दमबाजी केली जाते, याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे. चोराच्या मनात चांदणं, त्याप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांनी माझा आरोप स्वत:च्या मनाला लावून घेतला. कूपर यांचं त्यांनी पत्र मिळवलं असलं तरी फरोख कूपर खासगीत खरी माहिती सांगतील.’
दहा वर्षांच्या कालावधीत सातारा तालुक्यातील अनेक संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये खासदारांनी स्वतंत्र पॅनेल का टाकले नाही? उलट आमच्याशीच सेटलमेंट करत राहिले. आमचे नेते अजित पवारांपासून जिल्ह्यातील सर्वजण भ्रष्ट आहेत, असा निष्कर्ष जर त्यांनी काढला आहे, तर आमच्यासोबत जिल्हा बँकेत तरी कशाला राहता. उदयनराजेंच्या दहा वर्षांच्या खासदारकीचे फलित काय?, उदयनराजेंनी आऊट आॅफ वे जाऊन काय केलं? असे प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी उपस्थित केले. (प्रतिनिधी)