शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका
By सचिन काकडे | Published: September 29, 2023 11:18 AM2023-09-29T11:18:08+5:302023-09-29T11:18:31+5:30
मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी हातामध्ये उदयनराजेंचे पोस्टर घेऊन 'आले आले उदयनराजे' या गाण्यावर तुफान नृत्य केले.
सातारा : सातारा शहरात गुरुवारी गणेश विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांकडून मंडळांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टेज समोरच गणेश भक्तांनी 'आले रे आले उदयनराजे' या गाण्यावर जोरदार ठेका धरला. स्टेज आमदारांचा अन् गाणं खासदारांचं हे अनोखं समीकरण नागरिकांना उत्सवानिमित्त पाहायलाच नव्हे ऐकायलाही मिळालं.
गणेश मंडळांचा स्वागतासाठी दरवर्षी विसर्जन मार्गावर विविध राजकीय पक्षांकडून स्टेज उभारला जातो. यंदा देखील गोल बागेसमोर खा. उदयनराजे समर्थक तर राजपथावर आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांकडून भव्य स्टेज उभारण्यात आला होता. स्टेज समोरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक मंडळांचा या ठिकाणी सत्कार केला जात होता. एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जेव्हा आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थकांच्या स्टेज समोर आली तेव्हा मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी हातामध्ये उदयनराजेंचे पोस्टर घेऊन 'आले आले उदयनराजे' या गाण्यावर तुफान नृत्य केले. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंच्या एका समर्थकाने तरुणाच्या हातातील उदयनराजेंचे पोस्टर घेऊन बाजूला ठेवले. मात्र अन्य तरुणांच्या हातातही बरेच पोस्टर होते. मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली तरी तरुणांचा गाण्यावरील ठेका सुरूच होता. तरुणांचा हा जल्लोष सातारकरांच्या मात्र भलताच चर्चेचा ठरला.