उदयनराजेंच्या फैसल्यावरच सर्व पक्षांचा हौसला! : लोकसभा निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:35 AM2019-02-01T00:35:30+5:302019-02-01T00:35:51+5:30
सागर गुजर । सातारा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चितीसाठी सर्वच पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. उदयनराजेंचे ...
सागर गुजर ।
सातारा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चितीसाठी सर्वच पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. उदयनराजेंचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यांच्या फैसल्यावरच सर्व पक्षांचा हौसला अवलंबून आहे. कोणीच भूमिका स्पष्ट करण्यास तयार नाही. उलट प्रत्येकाने उदयनराजेंसाठी फिल्डींग लावत ते गळाला लागले नाहीत तर कोण असे पर्याय तयार करून ठेवले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, रिपाइं यांनी आपापले पर्याय तयार केल्याने सातारा लोकसभा औत्सुक्याची ठरणार आहे.
सलग दोन निवडणुकीत विक्रमी मताधिक्याचा जोरावरच उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडे पुन्हा उमेदवारी मागितली आहे. पक्ष अंदाज लागू देत नसल्याचे पाहून उदयनराजेंनीही आपल्या तिरप्या चाली खेळायला सुरुवात केली आहे. इतर पक्षांचे पर्याय खिशात ठेवून उदयनराजेंच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास भाजपचा हुकमी पर्याय त्यांच्यासमोर आहे. हे दाखवून देण्यासाठी त्यांनी पवारांच्या भेटीनंतर दोन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खलबते केली.
खासदार उदयनराजे भोसले आव्हान देण्यात जितके मुत्सद्दी आहेत, तितकेच राजकारणातील खेळ्यांतही वाकबगार आहेत. अजूनही भाजप, रिपाई हे पक्ष उदयनराजेंसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरुण सज्ज आहेत. गतवेळी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उदयनराजेंची शेवटपर्यंत वाट पाहिली. महायुतीच्या जागा वाटपात आठवलेंनी सातारा लोकसभा मतदारसंघ रिपाइंसाठी मागितला. उदयनराजेंनी स्वपक्षातूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने रिपाइंची अडचण झाली.
या निवडणुकीत रिपाइंने आग्रह धरलेला दिसत नाही. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी बुथवाईज जोरदार तयारी सुरू केली आहे. सेना-भाजप युतीबाबत अजूनही एकमत झालेले नसल्याने दोन्ही पक्षांनी पूर्वतयारी केली आहे. मागील निवडणुकीसारखे बेसावध न राहता हळूहळू प्यादी सरकावण्याचे काम दोन्ही पक्षांनी सुरू ठेवले आहे. भाजपमधून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेतून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव निवडणूक लढू शकतात. पुरुषोत्तम जाधव यांचीही सेनेत पुन्हा जाण्याची इच्छा दिसते. त्यांच्यासोबतच नितीन बानुगडे पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
रावते आज कोणता कानमंत्र देणार?
शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते शुक्रवारी (दि. १) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मागील दौºयात त्यांनी बूथच्या नियोजनावरून कार्यकर्त्यांवर आगपाखड केली होती. पालकमंत्री विजय शिवतारे यांना जिल्ह्यात यायला वेळ नाही. त्यामुळे रावतेंच्या भरवशावरच शिवसेनेचे ‘प्लॅनिंग’ सुरू आहे.