सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:27 PM2024-04-29T12:27:28+5:302024-04-29T12:27:56+5:30
निर्धारित संकल्प पूर्णत्वाची ग्वाही
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर संकल्पनामा जाहीर केला. यामध्ये सातारा, कऱ्हाड आणि वाई येथे आयटी पार्क उभारणे, टेक्नाॅलाॅजी सेंटर सुरू करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उदयनराजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संकल्पनामा तयार केला आहे. जिल्ह्यातील निर्धारित संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाहीही दिलेली आहे.
जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. पाणी, वीज, रस्ते अशा सुविधा असूनही मोठे उद्योग फारसे नाहीत. यासाठी केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाकडून साताऱ्यात टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच हे सेंटर आणि त्यायोगे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा पर्यटनात अग्रेसर राहावा, यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. यासाठी अजून काही प्रकल्प विचारधीन आहेत, असेही संकल्पनाम्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलाय. त्यामुळे मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. यातून रोजगार निर्माण होणार आहे. यासाठी चित्रीकरण एक उद्योग म्हणून आकाराला येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कृष्णा नदी माथा ते पायथा स्वच्छता, प्रदूषणमुक्त आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच नर्सिंग, दंतवैद्यक, शेती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी अग्रेसर राहणार, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साहित्य कला विद्यालयाची निर्मिती, देशातील पहिले बैलगाडा स्टेडियम सातारा लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार, जिल्ह्यामधील धरणातील पाणी शेतीला आणि पिण्यासाठी पुरेसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार, असेही या संकल्पनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.