“आता मी ढवळाढवळ करू का”; जिल्हा बँक निवडणुकांसंदर्भात उदयनराजे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:00 PM2021-11-08T22:00:53+5:302021-11-08T22:01:47+5:30
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा निवडणुकीतील उमेदवार फोडफोडीच्या ...
सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा निवडणुकीतील उमेदवार फोडफोडीच्या मुद्द्यावरून सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. या वादावादीतून पडळकर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचे वृत्त होते. यानंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात उदनराजे (Udayanraje Bhosale) सक्रीय झाले आहेत. माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात. आता मी ढवळाढवळ करू का, अशी विचारणा उदयनराजेंनी केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह उंडाळकर, रामराजे निंबाळकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. पैकी एका बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजेंची संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदयनराजेंनी खास त्यांच्याच शैलीत काही प्रश्नांना उत्तरे दिली.
जिल्हा बँक निवडणुकीत आता मी ढवळाढवळ करू का
जिल्हा बँक निवडणुकीत आता मी ढवळाढवळ करू का, असा इशारा उदयनराजे यांनी राष्ट्रवादीसह अन्य विरोधकांना दिला आहे. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात. आता मी ढवळाढवळ करू का, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.
अजून गाठी भेटी संपायच्या आहेत
अजून गाठी भेटी संपायच्या आहेत. सर्व मतदार आहेत. कुठे जायचे ते मी ठरवतो. सर्व समावेशक पॅनेलमध्ये जायचे का नाही ठरवायचेय. मी लोकांच्या सोबत आहे. मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही. मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन, बाकी कोणाच्या सांगण्याने नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उदयनराजे आणि रामराजेंच्या भेटीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची आगामी निवडणूक आणि संचालकपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदार उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अशातच उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून उदयनराजेंची वर्णी जिल्हा बँकेच्या संचालक पदावर लागणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यामध्येही अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.