Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट!
By नितीन काळेल | Published: April 9, 2024 07:25 PM2024-04-09T19:25:10+5:302024-04-09T19:26:13+5:30
उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच लढतीचे संकेत
सातारा : साताऱ्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले असून, भाजपकडे मतदारसंघ राहिल्यास खासदार उदयनराजेच रिंगणात राहणार आहेत. यामुळे शिंदे आणि उदयनराजेंतच लढत होण्याचे संकेत आहेत. त्यातच सध्या आघाडी एकसंध असताना महायुतीतील घुसमट समोर येऊ लागली आहे.
राज्यात मागील पावणे दोन वर्षात राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात झाल्या. त्याचे पडसाद आणि परिणाम जिल्ह्या-जिल्ह्यात दिसून येत आहेत. त्यामुळेच आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ मिळविणे आणि उमेदवार ठरविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचाही अपवाद नाही. कारण, २००९ पासून २०१९ पर्यंतच्या तीन निवडणुका पाहता निवडणूक आणि उमेदवारांची मोठी चर्चाच झाली नाही. पण, आताची निवडणूक ही चर्चा, रस्सीखेच, धुसफूस, नाराजी घेऊन आली आहे. त्यामुळेच अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. यापेक्षा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरूनच पेच सुरू आहे.
सातारा मतदारसंघ पूर्वी युतीत शिवसेनेकडे होता. आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी मतदारसंघ हवा आहे, तर अजित पवार गटाला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी मतदारसंघातून उमेदवार उतरावयाचा आहे. पण, दोघेही माघार घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचा शब्दही भाजपने अजित पवार गटाला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. पण, यावरही राष्ट्रवादी खूश दिसत नाही. त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही. हा मतदारसंघ भाजपला न मिळाल्यासही उदयनराजे हे पुन्हा रिंगणात असणार आहेत. त्यामुळे महायुतीचेच गणित फसू शकते.
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. शरद पवार यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आलेली आहे. यासाठी १५ एप्रिलला अर्जही भरला जाणार आहे. राष्ट्रवादीने आक्रमक चेहऱ्याचा उमेदवार दिल्याने साताऱ्याची लढत बिग फाईट होण्याचे संकेत आहेत.
महायुतीत सुंदोपसुंदी; डोकेदुखी वाढणार ?
निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पहिल्यापासून एकसंध दिसली. आतापर्यंत मेळावे, बैठका झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उध्दवसेना तसेच इंडिया आघाडीतील नेतेही सोबत होते. पण, महायुतीत सुंदोपसुंदी दिसत आहे. कारण, अजित पवार गटाला मतदारसंघ हवा आहे. त्यातच आतापर्यंतच्या मेळाव्यात आमदार मकरंद पाटील यांची अनुपस्थिती दिसली. तर ‘रिपाइं’चा आठवले गट सन्मान मिळत नाही म्हणून वेगळ्या भूमिकेत आहे. त्यामुळे ही नाराजी कायम राहिली तर महायुतीत डोकेदुखी वाढू शकते.