तुतारी चिन्ह चांगलं आहे, पण...; शरद पवारांच्या पक्षचिन्हावर उदयनराजे पहिल्यांदाच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 05:45 PM2024-04-06T17:45:24+5:302024-04-06T17:47:36+5:30
उदयनराजेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या तुतारीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
Udayanraje Bhosale ( Marathi News ) : सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याची घोषणा भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे. मात्र महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याने भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी घोषित केलेली नाही. असं असलं तरी उदयनराजेंनी निवडणूक प्रचाराला सुरुवातही केली आहे. भाजपने उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिल्यास त्यांचा संघर्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराशी होणार आहे. अशातच आज एका कार्यक्रम ठिकाणी उदयनराजेंचं तुतारीने स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या तुतारीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले की, "तुतारी म्हणजे काय? आज कोणीतरी हे चिन्ह घेतलं आहे. पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायची. कुठेही आपण लग्नात गेलं तरी तुतारी असतेच. चिन्ह चांगलं आहे, हे जरी खरं असलं तरी मला दुसऱ्या कोणत्या पक्षावर भाष्य करायचं नाही," अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सुटल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उदयनराजेंना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र उदयनराजेंनी ही जागा भाजपच्याच चिन्हावर लढावी, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते. त्यानंतर उदयनराजे तब्बल तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. दिल्लीवारीत ही जागा भाजपला सुटणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरच उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध सुरू
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नवीन उमेदवाराच्या शोधात असून पक्षातून आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावावर खलबते सुरू आहेत.