उदयनराजे भोसले यांच्या सुपुत्राची एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत स्वारी!
By admin | Published: November 15, 2016 11:53 PM2016-11-15T23:53:09+5:302016-11-15T23:53:09+5:30
कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीरप्रतापसिंहराजे यांनी अवघ्या अकराव्या वर्षी एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल मारली. ही कामगिरी आई दमयंतीराजे भोसले यांच्या सोबत अॅडव्हेंनचर पल्स या संस्थेच्या माध्यमातून केली.
वीरप्रतापसिंहराजे यांनी आपल्या आईच्या मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला. दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत अवघ्या अकरा वर्षांत धडक मारून एक वेगळाच संदेश दिला आहे. २६ आॅक्टोबरला नेपाळ काठमांडू येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली.
९ दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापसिंहराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान गोरकशेप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांनी दर्शन घेतले. मोबाईलमध्ये त्यांनी हे क्षण टिपले. एव्हरेस्टची ही धाडसी मोहीम समीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. (प्रतिनिधी)
एव्हरेस्ट बेस कॅम्प सुमारे सतरा हजार सहाशे फूट उंचीवर आहे. गाईड अन् शेरपा यांच्या सोबत नऊ दिवस निसर्गाशी संघर्ष करत आम्ही या कॅम्पपर्यंत पोहोचलो. वीरप्रतापसिंहराजे या टप्प्यावर नक्की पोहोचणार, याची खात्री होती. ५,१८० मीटरवरील गोरकशेप येथे पोहोचल्यावर आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील काही गिरीप्रेमींनी या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे.
- दमयंतीराजे भोसले