Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:07 PM2024-03-23T12:07:46+5:302024-03-23T12:08:31+5:30
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू
सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका बाजूला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दोन्ही पाटील प्रचाराला लागले आहेत. कऱ्हाड आणि वाई महाबळेश्वर या मतदारसंघात प्रचाराच्या थाटात सभा सुरू झाल्या असून मतदारांना शब्दाला जागल्याची आठवण करून दिली जात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाआघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला या मतदारसंघावर हक्कच असल्याने आपल्या वाट्याला मतदारसंघ यावा अशी भूमिका घेतली आहे. महायुतीतील हे दोन्ही पक्ष आपल्या मतावर ठाम असल्याने उमेदवार ठरविण्यास वेळ लागत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत ठाण मांडले आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार याबाबत निश्चिंतता असली तरीदेखील भाजप ही राष्ट्रवादीची मनधरणी कशाप्रकारे करते यावर बरेच अवलंबून आहे.
सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत दोन्ही आघाड्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ सध्या नाराजीच्या गर्तेतून जात आहेत. एका ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर भाजपला होणारा विरोध तर दुसरीकडे उमेदवार न दिल्याने भाजपबाबत असलेली नाराजी अशी दोन्ही अडचणीतून भाजपची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सध्या क्रमांक एकची ताकद निर्माण केलेली असतानादेखील भाजपला उमेदवारी देताना चाचपडत बसावे लागत आहे.
उमेदवारांची तयारी जागेची अडचण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडेही उमेदवार तयार आहेत. महायुतीतून जागेसाठीचा हिरवा कंदील अजित पवार यांना मिळालेला नाही. तर महायुती कोण उमेदवार देते यावर महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उमेदवार देणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या राजकारणावर उमेदवारी अवलंबून असल्याने प्रत्येकजण दुसऱ्याचा उमेदवार जाहीर करण्याची वाट पाहत आहे.
जागा सुटली, पण पक्षाअंतर्गत विरोध
महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सातारा लोकसभा मतदारसंघ असला तरी याठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यास पक्षातीलच लोकांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांचाही अंदाज पक्ष नेतृत्वाकडून घेतला जात आहे. तरीदेखील खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसे त्यांनी गेली पाच वर्षे पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे त्यांना नव्याने वेगळा प्रचार करण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही.