उदयनराजे, भाजपची छुपी युती उघड!साटेलोटे :
By admin | Published: February 13, 2017 10:57 PM2017-02-13T22:57:04+5:302017-02-13T22:57:04+5:30
गोडोली, वनवासवाडी, नागठाणे गटांत परस्परांविरोधातील उमेदवारांचे अर्ज मागे
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यात भारतीय जनता पक्षाशी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने केलेली छुपी युती सोमवारी उघड झाली. जिल्हा परिषदेच्या गोडोली, वनवासवाडी, नागठाणे या गटांत तसेच पंचायत समितीच्या पाटखळ, खेड, वनवासवाडी, शेंद्रे, अतीत, नागठाणे या गणांत भाजप व खासदार उदयनराजे गटाने साटेलोटे केले आहे.
सातारा तालुक्यात काँगे्रसने खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीसोबत जाहीर युती केली. मात्र, ही युती करत असताना काँगे्रसचे चिन्ह सातारा तालुक्यातून हद्दपार केले. काँगे्रसचे उमेदवार हे खासदार उदयनराजे भोसले यांनीच निवडले.
राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल लागल्यानंतर सातारा राजधानी विकास आघाडीची घोषणा केली होती. यावेळी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी सर्वच पक्षांतील नाराजांना आपल्या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले. खासदार उदयनराजे भोसले यांची ही आघाडी जिल्हाभर काहूर माजवेल, असे समजले जात होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षांतील नाराजांना सामावून घेत या आघाडीला खीळ बसली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी केली. मात्र, सातारा तालुका वगळता इतर ठिकाणी या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे करत खासदारांशी युती करणे टाळले.
या परिस्थितीत सातारा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार हालचाली केल्या. गोडोली, वनवासवाडी, नागठाणे गटांतील भाजपच्या उमेदवारांना उदयनराजेंनी माघार घ्यायला लावली. त्या बदल्यात वनवासवाडी, खेड, पाटखळ, नागठाणे या गणांत उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने उमेदवार दिलेले नाहीत. अतीत, शेंद्रे या गणांत सातारा विकास आघाडीला पाठिंबा देत भाजपने उमेदवार दिले नाहीत.
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांच्यात संघर्ष अटळ
साताऱ्यातील बहुचर्चित मनोमिलन तुटल्यानंतर सातारा पालिकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली. हीच खेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येही सुरू ठेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला शह देण्याची व्यूहरचना खासदार उदयनराजे भोसले यांनी आखली आहे. त्यासाठी ते काँगे्रस व भाजपाचीही मदत घेत आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.