‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:19 PM2017-10-05T17:19:48+5:302017-10-05T17:25:36+5:30

Udayanraje Pawar Saheb's car stopped being stopped! | ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत!

‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत!

Next
ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजेंकडून उदयनराजेंची उडविली खिल्ली गुण उधळले त्याचे पाप भोगा; दुसºयाकडे कशाला बोटे दाखवता?उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला: शिवेंद्रसिंहराजेंची टीका

सातारा : ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उडविली. सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उदयनराजेंना मी पणाचा ‘व्हायरस’ जडला आहे. मला अडकविण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे, असं ते म्हणतात. आपण जे गुण उधळतो, पराक्रम करतो, त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते स्वत:ला मोठा नेता समजतात, मग त्यांनी असं बोलणं बरं दिसत नाही. दुसºयाकडे बोटे दाखवून आपण केलेले पाप झाकून जाणार आहे का?, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केली. 


‘मी वरच्या लेवलचे राजकारण करतो, बाकीचे राजकारणी आपल्यासोबत किरकोळ आहेत, असं उदयनराजे कायम सांगत असतात. हो तेही बरोबरच आहे, ते तंद्रीतून उतरले तर त्यांना पृथ्वीवर आल्याचा आभास होईल. समोरासमोर या, असं वारंवार ते आव्हान देतात. आम्ही चार वेळा समोरा-समोर आलो, काही दिवसांपूर्वी त्यांनी रात्रीची शहरात शिवार फेरी काढली होती. तेव्हाही मी त्यांच्या समोर गेलो होतो. पुण्यात प्रदूषणाचा त्रास झाला म्हणून आम्ही काय साताºयात हवा बदलायला येत नाही,’ अशा शब्दांतही शिवेंद्रसिंहराजेंनी खरपूस समाचार घेतला.


जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, कर्जमाफी, सिंचनाचे प्रश्न, मेडिकल कॉलेज आदी प्रश्नांबाबत खासदारांना गांभीर्य नाही, पण मात्र त्यांना टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्याचा प्रश्न मोठा वाटतो. कलेक्टरसोबत खास बैठक घेऊन स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नाची ढाल केली गेली. नवीन व्यवस्थापनाने स्थानिकांना बेरोजगार करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांना या टोलनाक्याच्या प्रश्नात एवढा रस का आहे?, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला. 


कास धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मार्गी लावला. विदर्भाच्या अनुशेषामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रकल्प घेता येणार नव्हता. माझ्या पत्रावर अजित पवारांनी मंत्रालयात बैठक लावली होती. सातारा शहर व आजूबाजूच्या १५ गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी हा प्रकल्प होणार असल्याने तो पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे येत्या दिवाळीत या कामाची सुरुवात होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत पंचायत समितीने विरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? या प्रश्नावर शहराची हद्दवाढ झाली तर त्रिशंकू भागासह हद्दवाढीत येणाºया ग्रामपंचायतींचा फायदाच होणार आहे, पण स्थानिक जनतेची तशी मागणी असल्याने लोकप्रतिनिधींही जनतेची भावना मांडली आहे, असे ते म्हणाले. 

‘फास्ट’ पळून शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागले

उदयनराजेंना ‘फास्ट’ गाडी चालविण्याची सवय आहे. राजकारणातही ते खूप पळत सुटले. मात्र, पळून-पळून त्यांना शेवटी पवार साहेबांकडेच यावे लागले. हे कालच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे, अशी कोपरखळी शिवेंद्रसिंहराजेंनी मारली.

नगराध्यक्षांना अधिकार वापरू द्या की...

नगराध्यक्षा सामान्य घरातील आहेत, मात्र आईसाहेब पालिकेत जाऊन ढवळाढवळ करत आहेत. नगराध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरू द्या की, ते हिरावून का घेताय?, असा सवालही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.

Web Title: Udayanraje Pawar Saheb's car stopped being stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.