साताऱ्यात भाजपच्या बैठकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदाचा ठराव
By दीपक शिंदे | Published: June 21, 2024 12:55 PM2024-06-21T12:55:00+5:302024-06-21T12:56:10+5:30
राज्यसभेवर जिल्ह्यातीलच पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक आढावा बैठकीत खासदार उदयनराजेंना केंद्रात आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात मंत्रिपद देण्याबाबत तसेच उदयनराजे लोकसभेचे खासदार झाल्याने राज्यसभेवर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यालाच संधी मिळावी, असा ठराव एकमताने करण्यात आला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर भाजपची आढावा बैठक झाली. यावेळी सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, अविनाश कदम आदी उपस्थित होते.
या बैठकीत सातारा लोकसभांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा आणि त्यांना केंद्रात चांगले मंत्रिपद मिळावे, यासाठी ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला. सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना मोठे मताधिक्य देण्याचे काम केले. त्यामुळे त्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेंना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला.
माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी विधानसभा बैठक आणि वैयक्तिक मांडणीमधील विषयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कोअर कमिटीकडे देणार असल्याचे सांगितले.
यावेळी सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कऱ्हाड उत्तरचे आणि विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, प्रिया शिंदे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, कऱ्हाड दक्षिणचे निवडणूक प्रमुख धनंजय पाटील, कोरेगावचे विधानसभा निवडणूक प्रमुख भरत मुळे, पाटणचे विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमबाबा पाटणकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.