तिरकी चाल खेळत उदयनराजेंचा ‘चेक मेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:57 PM2018-06-24T22:57:42+5:302018-06-24T22:58:10+5:30
सातारा : राजकारणात आपल्या विरोधकांना नेहमीच ‘चेक मेट’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी बुद्धिबळातही आपल्या हुशार खेळीचे चातुर्य दाखविले आहे. सारीपाटावर आपल्याला कोंडीत पकडणाºया बुद्धिबळ प्रशिक्षकाला वजिराच्या एकाच चालीत त्यांनी पराभूत केले.
आॅल इंडिया चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सातारा पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘खासदार चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे’ उद्घाटन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर खासदार उदयनराजे व बुद्धिबळ प्रशिक्षक जयंत उथळे यांच्यात सलामीचा सामना झाला. उथळे यांचा अनुभव दांडगा असल्यामुळे ते सुरुवातीला आक्रमक चाली खेळत होते. उदयनराजेंच्या प्याद्यांना अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मात्र, सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दाखवत दुसºया बाजूने उदयनराजेंची आक्रमक खेळी केली. त्यांनी आडव्या-तिडव्या चालींच्या उंट अन् घोड्याचा पुरेपूर वापर करत स्पर्धकाच्या प्याद्यांची दाणादाण उडवली. शेवट्याच्या टप्प्यात आपल्या वजिराला हात घालत त्यांनी उथळे यांच्या राजाला चेक मेट दिला आणि इथेच खेळ संपला अन् उदयनराजे जिंकले.
यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, सुजाता राजेमहाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवाजी उदय मंडळाच्या हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे.
जिंकण्याचीच इर्ष्या बाळगा...
‘बुद्धिबळ म्हटलं की कोणाचा तरी विजय अन् कोणाचा तरी पराभव होणार, हे निश्चित आहे. मात्र, पराभवाचे वाईट वाटून घेऊ नये. उलट ज्यांनी मला आता हरवलं आहे, त्याला पुढच्या वेळी मी हरवणारंच, अशी इर्ष्या मनात बाळगली पाहिजे,’ असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.
पुढील वर्षी भव्य स्पर्धा
‘बुद्धिबळ हा खेळ म्हणावा इतका सोपा नाही. या खेळात एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्यावर कशाप्रकारे घातपात होऊ शकतो, आपण कोणाला जवळ केलं पाहिजे आणि कोणाला दूर केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी या खेळातून शिकायला मिळतात. पुढच्या वेळी याही पेक्षा भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन केले जाईल, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.