राष्ट्रवादीच्या राज्य बैठकीत उदयनराजे यांची हजेरी...
By admin | Published: December 29, 2016 12:29 AM2016-12-29T00:29:12+5:302016-12-29T00:29:12+5:30
९ जानेवारीला आंदोलन : नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार
सातारा : राजधानी सातारा विकास आघाडीची आदल्या दिवशी (मंगळवारी) घोषणा करणारे खासदार उदयनराजे भोसले बुधवारी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्य बैठकीला हजर राहिले. मोजक्या शिलेदारांसहित त्यांनी उपस्थिती लावली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र आघाडीची घोषणा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत खासदार शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची चर्चा कपोलकल्पितच ठरली.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजधानी सातारा विकास आघाडीची संकल्पना मंगळवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी गुलटेकडी (पुणे) येथील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील व संपूर्ण राज्यातील प्रदेश प्रतिनिधी हजर राहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय झाला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन ९ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी खासदार व आमदारांच्या बैठकीत खा. शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी व प्रदेश प्रतिनिधींची त्यानंतर बैठक झाली. (प्रतिनिधी)
शरद पवारांशी शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बुधवारच्या बैठकीला अनुपस्थित होते. मात्र, घरगुती कारणाने आपण घरीच राहिल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली असून, यात साताऱ्याशी संबंधित अनेक राजकीय घडामोंडीबाबत गंभीर चर्चा झाली आहे. तसेच येत्या ८ जानेवारी रोजी शेंद्रे येथील ‘अजिंक्यतारा’ उद्योग समूहाच्या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमासही पवारांनी येण्याचा शब्द दिला आहे.
निवडणुकांमध्ये निधी नाही
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रदेश कार्यालयाकडून निधी दिला जात होता. परंतु आता पक्षाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत, तसेच आर्थिक निधीची तरतूदही करण्यात यावी, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत केले.