उकाडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:34 AM2021-01-21T04:34:48+5:302021-01-21T04:34:48+5:30
सातारा : सातारा शहर व परिसरात उकाडा पुन्हा वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगााळ वातावरणामुळे सातारकर ...
सातारा : सातारा शहर व परिसरात उकाडा पुन्हा वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगााळ वातावरणामुळे सातारकर सुखावले असतानाच गारवा संपून सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. थंडाव्यासाठी शीतपेय, आईस्क्रीमचा आधार घेणे पुन्हा सुरू झाले. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत असून, सायंकाळीच लोक घराबाहेर पडत आहेत.
मोसंबीचे दर उतरले
सातारा : गेल्या काही दिवसांपासून मोसंबीचा दर उतरला आहे. सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलो या दराने मोसंबी विकली जात आहेत. दर उतरल्यामुळे शहरात मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होत आहे. हे दर पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दर उतरल्याने खरेदीतही वाढ झाली आहे.
नागरिक त्रस्त
वाई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने लावत आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महागणपती घाटावरील जुन्या व नव्या पुलावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कांद्याचे दर स्थिर
लोणंद : बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. सध्या ३० ते ३५ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून कांद्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत दर आणखीन उतरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पर्यटकांची गर्दी
वाई : वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणाचा परिसर सध्या पर्यटकांना खुणावू लागला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणारे हौशी पर्यटक धोक, बलकवडीला भेट देऊन येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घोडेस्वारी तसेच नौकाविहाराला पर्यटक पसंती देत असून, शनिवार व रविवार हा परिसर पर्यटकांनी गजबजून जात आहे.
सर्रास वृक्षतोड
सातारा : सातारा शहराच्या वैभावात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडांच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की, काही दिवसांनंतर त्याची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर वन विभागाच्या वतीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
घाणीचे साम्राज्य
सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जलवाहिनीला गळती
सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीच्या वॉल्व्हला गळती लागल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. पालिकेने ही गळती कायमस्वरूपी काढावी, अशी मागणी होत आहे.