कृषी विज्ञान केंद्रांना अखेरची घरघर...
By admin | Published: June 11, 2015 10:31 PM2015-06-11T22:31:26+5:302015-06-12T00:45:04+5:30
चाफळ विभागातील स्थिती : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम; लाखोंचा निधी पाण्यात; शेतकऱ्यांना मिळेना मार्गदर्शन
चाफळ : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चाफळसह पाटण तालुक्यातील अनेक गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना झाली. मात्र गाजावाजा करीत स्थापन झालेली ही मंडळे शेतीविषयक जागृती करण्याचे सोडाच; पण ती अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात कृषी विभागाचे कार्यालय असतानाही अधिकारीच गायब असल्यामुळे या विज्ञान मंडळांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी चाफळचा कृषी विभाग सतत जागृत असायचा. चाफळसह माजगाव, पाडळोशी, धायटी, केळोली, नाणेगाव या गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना करण्यात आल्या; परंतु ही मंडळे जागृत आहेत की नाही? याची कृषी अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नसल्याचे दिसून येत आहे. ही मंडळे जागृत करणे महत्त्वाचे आहे. मंडळे स्थापन करताना कृषी विभागाने मोठा गाजावाजा केला. कृषी संघटक, सचिव व सदस्य अशी मंडळाची कार्यकारिणीही निवडण्यात आली. काही कृषी सहायकांनी ठराविक गटाच्या मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरत मंडळाची स्थापना केल्याने शासनाच्या मूळ हेतूला पाने पुसण्याचा प्रकार घडला. त्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांवर झाला. शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित मंडळांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कुचराई केली. त्याचबरोबर काही मंडळांनी अक्षरश: अनुदान लाटण्याचा प्रकार केला. कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, आळंबी, भाजीपाला, फुलशेती, हरितगृहे, गांडूळखत, सेंद्रीय खत आदीबाबत चर्चासत्रे घडवून आणणे क्रमप्राप्त असतानाही असे काहीच घडलेले नाही.
यावेळी शासनस्तरावर कृषी विज्ञान मंडळांना टेबल, खुर्च्या, पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आली होती. मात्र आजच्या परिस्थितीत हे साहित्य नक्की कोणाकडे असेल? हे सांगणेसुध्दा कठीण बनले आहे. यावर संबंधित कृषी सहायकांचे नियंत्रण असायला हवे होते; परंतु दोन ते तीन आठवड्यांतून एकदाच चाफळला येणाऱ्या कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास वेळ मिळत नसल्याच्याही तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कृषी सहायकांच्या नियंत्रणाअभावी कृषी विज्ञान मंडळांसाठी मिळालेला शासनाचा लाखोंचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
चाफळ विभागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच शासनाच्या विविध योजनांही शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचतील. या कृषी विज्ञान केंद्रांना संजीवनी मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.