उंब्रज _ अंध युवक अमित करतोय स्पर्शाच्या साह्याने वस्तूची ओळख अन् तोंडी हिशोब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:26 AM2017-12-03T01:26:34+5:302017-12-03T01:26:38+5:30
उंब्रज : फक्त आणि फक्त स्पर्शाच्या साह्याने वस्तूंची ओळख लक्षात ठेवून तो किराणा मालाचे दुकान चालवतोय.. तोंडी हिशोब करतोय..
अजय जाधव ।
उंब्रज : फक्त आणि फक्त स्पर्शाच्या साह्याने वस्तूंची ओळख लक्षात ठेवून तो किराणा मालाचे दुकान चालवतोय.. तोंडी हिशोब करतोय.. ग्राहकाने दिलेली नोट ओळखून उर्वरित रक्कम चिल्लरसह काही सेकंदात परत देतोय, ही वैशिष्ट्ये आहेत उंब्रज कोरिवळे रस्त्यालगत असलेल्या अमित काशिनाथ स्वामी या अंध युवकाची.
अमित हा जन्मत:च अंध आहे. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांतच तो अंध असल्याचे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. यापुढे आपल्या मुलाला डोळ्यांनी दिसणारच नाही, याचा धक्का त्यांना बसला; पण ते सावरले. तेच त्याचे डोळे बनले. त्यांनी अंध अमितला डोळस करण्याचा निर्धार केला. त्यात त्यांची आर्थिक बाजूही कमजोर होती. त्याला अंधशाळेत ते घालू शकत नव्हते. त्यांनी स्वत:च अमितला घडवण्याचा, शिकवण्याचा निर्णय घेतला.
अमितचे वडील काशिनाथ स्वामी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. अमित जसा लहानांचा मोठा होऊ लागला. तसा ते त्याला घेऊन दुकानात जाऊ लागले. ज्या पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांचा हात धरून अंक, अक्षरे काढण्यास शिकवतात. त्याच पद्धतीने अमितचे वडीलच त्याचे शिक्षक बनले. किराणा मालाच्या दुकानातील एक-एक वस्तू अमितच्या हातात देऊ लागले. वस्तूंची ओळख होऊ लागली. वस्तूंच्या स्पर्शाने तो वस्तू अचूक ओळखू लागला.
आर्थिक व्यवहार करताना नोटा कशा ओळखायच्या हा प्रश्न त्यांच्या समोर होता. पण त्याने नोटांचा अभ्यास केला. नोटांच्या किमती जशा वेगळ्या तशीच त्या नोटांची लांबीही कमी जास्त असते. हे गुपित त्याने ओळखले. हातात आलेली नोट आपल्या जवळच्या नोटांशी जुळवून त्याची किंमत तो ओळखू लागला. तोंडी हिशोब ही शिकला. अनेकजण कॅल्क्युलेटर वापरून हिशोब करतात; पण अमित हे हिशेब अल्पावधीत तोंडीच करतो. नोटांच्या सारखाच त्याने चिल्लरचा ही अभ्यास केला. यामुळे दुकान चालवण्यासाठी येणारे अडथळे त्याने पार पाडले.
वडिलांच्या मदतीने अमितने प्रत्येक वस्तूची दुकानात विभागवार मांडणी केली आहे. स्वतंत्र कप्पे तयार केले आहेत. सुट्या पैशांसह सर्व प्रकारच्या नोटांचे स्वतंत्र कप्पेही करून घेतले. आता अमित एकटा दुकानात असला तरी वस्तू घेण्यासाठी आलेले ग्राहक माघारी जात नाही. ग्राहकाने मागितलेली वस्तू बिनचूकपणे अमित त्यांच्या हातात देतो. खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे घेऊन उर्वरित रक्कमही तो परत करतो. त्याने हे सर्व स्वत:च्या निरीक्षणाच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य केले आहे. दिवसभर किराणा मालाच्या दुकानात थांबून सर्व व्यवहार सांभाळणारा अमित यावरच थांबलेला नाही. तो मोबाईल फोनचा ही सहजपणे वापर करतो. जवळपास पाचशे मोबाईल नंबर त्याच्या तोंडपाठ आहेत.
मी अनुभवातूनच व्यवहारातील आकडेमोड व हिशोब शिकलो. आता या व्यवसायातच माझे मन रमले आहे. मला या व्यवसायात अजून खूप प्रगती करायची आहे. पण भांडवल नाही. शासनाच्या विविध योजना आहेत; पण त्यांची माहिती मिळत नाही. शासनाच्या योजनेतून मला आर्थिक मदत झाली तर किराणा व्यवसाय वाढीसाठी माझ्या डोक्यात असलेल्या विविध कल्पना मला कृतीत आणणे सोपे जाईल.
- अमित स्वामी, किराणा दुकान चालक
अमित अंध आहे, हे समजल्यानंतर आम्ही त्याला वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दाखवले. तपासण्या केल्या; पंरतु त्याच्या डोळ्याची मुख्य रक्तवाहिनी कमकुवत असल्याने त्याला कायमस्वरुपी अंधत्व असल्याचे आम्हाला समजले. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुटुंबातील प्रत्येक गरजा पूर्ण करणे आर्थिक अडचणीमुळे अवघड होते. पण आम्ही या अडचणी वर मात करत लढतोय. अमितला भावी काळातही तो अंध असल्यामुळे अडचणी येऊ नयेत म्हणून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- काशिनाथ स्वामी