उंब्रज की पाल... काकांची नवी चाल!
By Admin | Published: December 27, 2015 11:35 PM2015-12-27T23:35:44+5:302015-12-28T00:38:29+5:30
कऱ्हाड उत्तरेत उंडाळकरांचा ‘बॉम्ब’ : काका म्हणे.. उत्तरेत कऱ्हाड तालुक्यातून नव्या नेतृत्वाची गरज; कहीं पे निगाहे कहीं पे निशाना
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -‘मी राजकारणात कधीही कऱ्हाड दक्षिण-उत्तर असा भेदभाव केलेला नाही. उत्तरेत संघर्षातून नेतृत्व पुढे आले तर आमदार होऊ शकते. उंब्रज, मसूर, चरेगाव, पाल येथून नवे नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहीन,’ असा राजकीय बॉम्ब ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकरांनी नुकताच उंब्रज येथे टाकला. ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ साधणाऱ्या उंडाळकरांच्या बोलण्यामागचं खरं ‘उत्तर’ कोणालाच सापडेनासं झालंय. परिणामी, राजकीय वर्तुळात त्यांच्या बोलण्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात विलासराव पाटील- उंडाळकर अन् दिवंगत पी. डी. पाटील यांच्या गटाचे सख्ख्य अनेक वर्षे जनतेने पाहिले आहे. लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या या तालुक्यात दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून आहेत. त्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मदतीचा हात द्यायचा, हा अलिखित करार अनेक वर्षे दोन्ही गटांनी सांभाळला होता.
त्यामुळे तालुक्यातील विविध संस्थांमध्ये या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत गेली. परिणामी विरोधकांची डाळ इथे शिजतच नव्हती. यात दक्षिणच्या नेतृत्वाची पकडच अधिक भक्कम होती, हे मात्र नक्की !
सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी अजित पवारांच्या रेट्यामुळे उंडाळकरांची जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ता गेली. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणातही आमदार बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महाआघाडी आकाराला आली अन्
बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. यावेळी खऱ्या अर्थाने दक्षिण अन् उत्तरेतील या दोन आमदारांच्यात अंतर पडल्याचे स्पष्ट झाले.
त्याच्या अगोदरही घडलेल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेतच बरं..!
उत्तरेतील नव्या नेतृत्वाबद्दल उंडाळकरांनी केलेल्या भाष्यामुळे त्यांनाही उत्तरमध्ये कऱ्हाड तालुक्यातीलच आमदार हवा आहे, असे वाटते. पण त्यांना उंब्रज,
पाल, चरेगाव, कोपर्डेचे नाव घेऊन दुसऱ्याच कोणा नेतृत्वाचा ‘उदय’तर करायचा नाही ना? अशीही चर्चा सुरू झालीय.
काकांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही तर दिलीय; पण पालीचा ‘देव’ त्यांना पावणार का? उंडाळकरांच्या महत्त्वकांक्षेचा ‘पतंग’ चरेगावातून उडणार का?, मसूरमध्ये कोणी उंडाळकरांना ‘माण’ देत बंडखोरीचं रण‘सिंग’ फुंकणार का? हे पाहावे लागेल. सध्या तरी काका उंब्रजच्या सभेत नेमकं ‘काय’ बोलले अन् असंच ‘का’ बोलले याचा जनतेत खल सुरू आहे. काकांची ‘गुगली’ नेमकी कोणाची ‘विकेट’ घेणार, हा सुद्धा प्रश्न आहे. खरंतर काकांच्या मनाचा थांगपत्ता आत्तापर्यंत कोणालाच लागलेला नाही. अनेकदा त्यांची दाखवायची दिशा एक असते, तर जाण्याचा मार्ग दुसराच असतो. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा अर्थ नेमका काय अन् कसा घ्यायचा, हे लोकांना समजेनासे झालेय....
सन २००४ मध्ये कऱ्हाड शहर उत्तर मतदारसंघात असताना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात तत्कालीन नगरसेवक अरुण जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी जाधवांनी पाटलांना मेटाकुटीला आणले होते. त्यावेळीही जाधवांच्या उमेदवारीला उंडाळकरांचा छुपा पाठिंबा मानला जात होता.
सन २००९ मध्ये डॉ. अतुल भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवित उत्तरेवर स्वारी केली. बाळासाहेबांनी बंडखोरी करीत बाजी मारली खरी; पण भोसलेंना उत्तरेत पाठवून उंडाळकरांनी आपला दक्षिणेतील मार्ग सुकर केल्याचेही म्हटले जाते.
कऱ्हाड उत्तरमध्ये पुनर्रचनेनुसार कऱ्हाड, खटाव, कोरेगाव अन् सातारा या ४ तालुक्यांतील मतदारांचा समावेश आहे. यातील अंदाजे ४५ टक्के मतदार कऱ्हाड तालुक्यातील तर उर्वरित ५५ टक्के मतदार खटाव, कोरेगाव अन् सातारा तालुक्यांतील आहेत. त्यामुळे येथे विजयाचा ‘चौकार’ ठोकण्यासाठी चारही तालुक्यांत संपर्क महत्त्वाचा आहे.
‘मनोधैर्य’ थांबणार नाही
गत विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना राष्ट्रवादीच्या विरोधात मिळालेली मते विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे या दोघांचेही ‘मनोधैर्य’ निश्चितच वाढले आहे. परिणामी हे दोन्ही उमेदवार २०१९ मध्ये उत्तरच्या फडात निश्चित मानले जातात. काकांनी नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ केल्यास उत्तरेत चौरंगी लढतही पाहायला मिळू शकते.