पेन्शन योजना, वेतन मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे छत्री आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेवर मोर्चा 

By नितीन काळेल | Published: July 15, 2024 03:49 PM2024-07-15T15:49:09+5:302024-07-15T15:49:56+5:30

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह ...

Umbrella movement of Anganwadi workers for pension scheme, salary demand, march on Satara Zilla Parishad | पेन्शन योजना, वेतन मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे छत्री आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेवर मोर्चा 

पेन्शन योजना, वेतन मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे छत्री आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेवर मोर्चा 

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका-मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येत छत्री आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागील ३५ वर्षांपासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत. परंतु, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आली आहेत. ही सर्व कामे त्या करतात. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे. शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करते. परंतु, सेविका आणि मदतनीसांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करत नाही. याबाबतच विचार व्हावा. 

सेविका या अर्धवेळ कर्मचारी असून शासन पूर्णवेळ काम देत आहे. त्यामुळे शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे. शासन नवी योजना लागू करते तेव्हा सेविकांनाच काम व मोबदला दिला जातो. तरीही सेविका आणि मदतनीस या दोघींचाही विचार करुन त्यांना आऱ्थिक लाभ वितरित करावा, कोरोना काळातील २१ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लाभ तातडीने द्यावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलन अॅड. नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरे, संघटक संदीप माने, विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Umbrella movement of Anganwadi workers for pension scheme, salary demand, march on Satara Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.