वाईतील चौकात अनधिकृत मंदिराचे अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 03:51 PM2019-09-20T15:51:53+5:302019-09-20T15:55:25+5:30
वाई येथील भारतरत्न विनोबा भावे चौकात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाला कोटेश्वर देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतला. त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध गणेश मंडळ असा वाद सुरू झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामाबाबत ट्रस्टने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर ट्रस्ट दिशाभूल करीत आहे, असा आरोप मानाचा गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक मलटणे यांनी केला आहे.
वाई : येथील भारतरत्न विनोबा भावे चौकात सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाला कोटेश्वर देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतला. त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध गणेश मंडळ असा वाद सुरू झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामाबाबत ट्रस्टने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर ट्रस्ट दिशाभूल करीत आहे, असा आरोप मानाचा गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक मलटणे यांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, ब्राह्मणशाहीतील विनोबा भावे चौकात आरसीसी बांधकाम सुरू आहे. याबाबत श्री कोटेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिरात मानाचा गणपती मंडळाने चतुर्थीला गणपती ठेवला आहे.
यासंदर्भात ट्रस्टने अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामध्ये हे मंदिर अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी भारतीय संघराज्य विरुद्ध गुजरात राज्य, या खटल्यात आदेश दिले आहेत की, कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर धार्मिक बांधकाम ज्यात मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा यापैकी काहीही असेल तर ते सार्वजनिक रस्त्यावर राहता कामा नये. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना अशी बेकायदेशीर बांधकामे किती आहेत, याचा अहवाल देण्यास सांगितले असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे.
या मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे माहीत असूनही जिल्हाधिकारी, वाईच्या मुख्याधिकारी तसेच स्थानिक सरकारी यंत्रणांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून, याबाबत सात दिवसांच्या आत संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. अन्यथा संबंधित बेकायदेशीर बांधकामाची केस सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येईल, असे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विनोबा भावे यांचे वाईतील वास्तव्य लक्षात घेऊन पालिकेने २००६ मध्ये ब्राह्मणशाहीतील या चौकाचे, भारतरत्न विनोबा भावे चौक, असे नामकरण करून तशी कोनशिला बसविली होती. त्यानंतर काही महिन्यांतच वाहनाच्या धडकेने कोनशिला पडल्याने येथील मोकळ्या जागेचा वापर वाहनतळ म्हणून होऊ लागला. मद्यपी व मोकाट कुत्री यांचा वावरही त्याठिकाणी वाढला होता. विनोबा भावे यांच्याविषयी आदराची भावना असल्यानेच मोडकळीस आलेल्या कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार मंडळाने लोकवर्गणीतून केला होता.