अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त; भाजीविक्रेत्यांवरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:21+5:302021-02-12T04:37:21+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त करण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. गुरुवारी ठिकठिकाणचे ...
सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त करण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. गुरुवारी ठिकठिकाणचे तीन मोठे फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आले तर रस्त्यावरील दहा भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
सातारा शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शासकीय इमारती, विजेचे खांब, फुटपाथ तसेच झाडांवर पालिकेची परवानगी न घेता मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्याने शहराचे रूप बकाल होऊ लागले आहे. त्यामुळे पालिकेने अशा फुकट्या जाहिरातदारांवर कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने गुरुवारी शहरात कारवाई मोहीम राबविताना तीन मोठे फ्लेक्स बोर्ड जप्त केले. तसेच फूटपाथ व रस्त्यावर बसून भाजीविक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले.
शहरातील बाजार समितीच्या आवारात फुटपाथवर बसलेल्या विक्रेत्यांना हटवितांना काही विक्रेत्यांनी अतिक्रमणच्या कर्मचऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला. एका विक्रेत्याने तर कर्मचाऱ्याना ‘तुम्हाला काय करायचे ते करा’ असा इशाराच दिला. दरम्यान, सर्वांचा विरोध झुगारून अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली. दिवसभरात दहा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी कारवाई पूर्वीच आपला गाशा गुंडाळला. ही मोहीम पुढे सुरू राहणार असल्याची, माहिती प्रशांत निकम यांनी दिली.
फोटो : ११ पालिका कारवाई
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांशी गुरुवारी भाजीविक्रेत्यांचा शाब्दिक वाद झाला.