Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन
By संजय पाटील | Published: April 18, 2023 01:48 PM2023-04-18T13:48:41+5:302023-04-18T14:06:22+5:30
लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते
संजय पाटील
कऱ्हाड : महाराष्ट्राची वरदायीनी असलेल्या कोयना नदीचा काठ सध्या पोखरला जातोय. पाटणपासून कऱ्हाडपर्यंत ठिकठीकाणी नदीकाठावर जेसीबी नाचवले जातायत. काहीजण परवाने घेऊन तर काही विनापरवानाच मातीचे बेसुमार उत्खनन करतायत. मातीसम्राटांनी मोठमोठे खड्डे खोदले असून काही ठिकाणी नदीकाठचे कडेही जमिनदोस्त करण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्र बदलले आहे, विस्तीर्ण झाले आहे.
महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली कोयना नदी दक्षिणेला वाहत जाऊन हेळवाक गावाजवळ पूर्व वाहिनी होते. कृष्णा नदीची ही सर्वात मोठी उपनदी आहे. तसेच कोयनेच्याही काही उपनद्या आहेत. याच कोयनेवर शिवसागर जलाशय असून कोयना धरणाची निर्मितीही करण्यात आली आहे. धरणापासून पुढे वाहत जाणाºया नदीपात्रात अनेक सिंचन योजना आहेत. तसेच निसरे व तांबवे येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. कोयनेच्या पाण्यावर लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले असून धरणाच्या माध्यमातून राज्य प्रकाशमान झाले आहे.
कोयनेतील पाण्याच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न झालेले असतानाच अनेकांनी लाल मातीत स्वत:चे उखळही पांढरे करुन घेतले आहे. नदीकाठावर असणाºया लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्यामुळे ठिकठीकाणी नदीपात्र बदलले आहे. विस्तिर्ण झाले आहे. त्याबरोबरच नदीकाठची शेतीही केवळ कागदावर उरली असून अनेक मळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत.
उगम ते प्रीतीसंगम
१२५ : किलोमिटर अंतर
कोयनेच्या उपनद्या
सोळशी - तापोळा
काजळी - संगमनगर
काफना - हेळवाक
केरा - पाटण
मोरणा - बेलवडे
वांग - येरवळे
माती उत्खननाचे दुष्परीणाम
- नदीकाठाची मोठ्या प्रमाणावर धूप
- ठिकठीकाणी नदीकाठ खचला
- खड्डे खोदल्यामुळे पाणी साचून राहिले
- नदीकाठची शेती वाहून गेली
- उत्खनन झालेल्या दिशेने नदीपात्र बदलले
- नदीकाठावरील जुन्या झाडांची कत्तल
- प्राणी, पक्ष्यांचे अधिवास नष्ट
२४ - नदीकाठची महत्वाची गावे
माती उत्खनन परवाने
४३ : पाटण तालुका
६१ : कऱ्हाड तालुका
जमिन गायब; उरला सातबारा
कऱ्हाड तालुक्यात सुपने गावापासून वारुंजीपर्यंत काही ठिकाणी लाल मातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे की, नदीपात्र बदलून नदीकाठची जमिनच गायब झाली आहे. शेतकऱ्यांकडे केवळ त्या जमिनीचा सातबाराच शिल्लक राहिला आहे. आपली जमिन शोधण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
नदीकाठ उद्ध्वस्त; रस्त्यांची दुर्दशा
लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते. त्यातच मातीच्या वाहतुकीमुळे गावागावातील पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. माती वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे हे रस्ते शेतकऱ्यांसाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.