उंडाळेतील राष्ट्रीय विचारांचे व्यासपीठ दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:35+5:302021-02-20T05:49:35+5:30
कराड : महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, दादा उंडाळकर यांचे विचार विलासराव पाटील काकांनी पुढे चालवले. काकांची पक्षविचारांची एक निष्ठा ...
कराड : महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, दादा उंडाळकर यांचे विचार विलासराव पाटील काकांनी पुढे चालवले. काकांची पक्षविचारांची एक निष्ठा वाखाणण्याजोगी होती. काकांनी जे-जे निर्माण केलं त्याचा लोकांच्यासाठी सदुपयोग केला. तेच काम उदयसिंह त्याच जोमाने पुढे चालवत आहेत. स्वातंत्र्यसंग्राम अधिवेशनाच्या माध्यमातून विलासकाकांनी राष्ट्रीय विचाराचं उंडाळेला व्यासपीठ निर्माण केले आणि अशा व्यासपीठावरून हजर राहण्याचा भाग्य लाभले यासाठी निमंत्रणाचीही गरज नाही, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
उंडाळे (ता. कराड) येथे स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ३८ व्या स्वातंत्र्यसैनिक संमेलनात खासदार पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रसाद कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, आदींची उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील म्हणाले, विलासराव पाटील काकांनी उंडाळे येथे समाजप्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. यातून माणूस वैचारिक सक्षम बनवला. काकांच्या अचानक जाण्याने हा प्रबोधनाचा कार्यक्रम यावर्षी नको असा काहींचा सुरू होता. मात्र, काकांनी सुरू केलेले काम अखंडपणे सुरू ठेवण्याची भूमिका स्मारक समितीने घेतली. यापुढील काळात ही काकांचे काम आम्ही तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवणार आहोत.
स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला व आपणाला स्वातंत्र्य व लोकशाही मिळवून दिली ती टिकविण्याचं काम युवकांनी करावे, असे आवाहन ॲड. पाटील यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थित स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तनाने झाली. यावेळी डॉ. गणेश देवी यांच्या सन्मानिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विश्वस्त विजयसिंह पाटील यांनी स्वागत केले तर आभार गणपतराव कणसे यांनी मानले. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते
फोटो :