उंडाळकर गटाचा निर्णय दोन दिवसांत शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:07+5:302021-06-16T04:50:07+5:30
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारांसह नेत्यांनी गाठीभेटींवर भर दिला ...
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारांसह नेत्यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. वेगवेगळ्या गटांचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. कराड तालुक्यात महत्त्वाचा गट असणाऱ्या अॅड. उदयसिंह पाटील यांच्या भूमिकेविषयीही कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे. येत्या दोन दिवसांत या गटाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यांतील ५ तालुक्यांत सभासद असणाऱ्या कृष्णा कारखान्याची निवडणूक येत्या २९ जून रोजी होत आहे. त्यासाठी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल यांच्याविरोधात डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल अशा तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणाचा पाठिंबा कोणाला? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर होणाऱ्या कृष्णेच्या पहिल्याच निवडणुकीत अॅड. उदयसिंह पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. पण निर्णय घेताना उदयसिंह पाटील सावध पावले टाकताना दिसतात; म्हणून तर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांचीही मते जाणून घेतलेली आहेत.
दरम्यान मध्यंतरीच्या काळात डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत अॅड. उदयसिंह पाटील सक्रिय होते. मात्र अनेक बैठका होऊनही त्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळेच तिरंगी लढतीची शक्यता बळावली आणि मग उंडाळकर गटाचा पाठिंबा कोणाला? हा विषय चर्चेत आला. पण या गटाचा पाठिंबा कोणाला? याचा निर्णय अजून तरी अधिकृतपणे झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुमची मते ऐकली आहेत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू, असे अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले होते. पण त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच दिसत आहे.
चौकट
दोन्ही मोहितेंचे प्रयत्न सुरूच ..
''कृष्णा'' च्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला पाठिंबा मिळावा म्हणून दोन्ही माजी अध्यक्ष मोहितेंचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या अॅड. उदयसिंह पाटील यांच्याबरोबर बैठका झाल्या आहेत. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा द्यावा म्हणून स्वतः सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी देखील अॅड.पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे खात्रीशीर समजते. आता पाटील काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे.
चौकट
पृथ्वीराज-उदयसिंह भेटीकडे लक्ष
कारखाना निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यासाठी अॅड. उदयसिंह पाटील यांनी गत आठवड्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यात कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला गेला. त्या वेळी अॅड उदयसिंह पाटील यांच्यासोबत कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व इंद्रजित चव्हाणही उपस्थित होते. मात्र दरम्यानच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुंबईला गेले आहेत. ते कराडला परतल्यावर बैठकीचा इतिवृत्तान्त यांच्यासमोर मांडला जाईल. त्यानंतर उंडाळकर गटाचा निर्णय होईल असे बोलले जाते. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोट
कारखाना निवडणुकीत काय भूमिका असावी यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यावरून साधक-बाधक अभ्यास केला आहे. येत्या दोन दिवसांत आमच्या गटाचा निर्णय आम्ही जाहीर करू.
अॅड. उदयसिंह पाटील
फोटो -अॅड.उदयसिंह पाटील