महाराष्ट्रातील पहिला तलाव जोड प्रकल्प पूर्णत्वाकडे, वेळू येथील २१० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:40 PM2018-02-22T22:40:27+5:302018-02-22T22:42:54+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्रातील पहिल्या नावीन्यपूर्ण तलाव जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
जयदीप जाधव ।
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्रातील पहिल्या नावीन्यपूर्ण तलाव जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पाझर तलावांची २८५ टीसीएम पाणीसाठा निर्मिती क्षमता असून, २१० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे व पाणी फाउंडेशनचे काम चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पाण्याअभावी तडफडणारे वेळू गाव आता हिरवेगार होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्या पाठोपाठ कोरेगाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे अल्प प्रमाण असल्याने अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांमधील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी वेळू गावांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होत होती. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला नोहेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.
पाण्याअभावी गावातील बहुतांशी शेती उजाड पडत होती. ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी वेळू ग्रामस्थ एकजूट झाले. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध प्रकल्प राबवले. अभिनेता अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभागी होऊन पावसाचे पाणी साठवणे व मुरवणे, याचे मोठ्या प्रमाणात काम केले. जलयुक्त अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पाबरोबर तलाव जोड प्रकल्पालाही सुरुवात केली.
वेळू-बेलेवाडी गावाच्या वरती तलाव नंबर एक हा जुना पाझर तलाव असून, या तलावात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी येते. हा तलाव भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओढ्यातून वाहून जात होते; परंतु तलाव जोड प्रकल्पामुळे या अतिरिक्त पाण्याचा इतर पाझर तलाव पूर्ण भरण्यासाठी वापर होणार आहे. तलाव नंबर एकपासून ते तलाव नंबर पाचपर्यंत अठराशे मीटर अंतर दोन फूट व्यासाच्या सिमेंट पाइपलाईनने बंदिस्त जोडली जाणार आहेत. या कामासाठी खासदार अनु आगा यांनी विशेष बाब म्हणून ९६.३९ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. तलाव नंबर एक वगळता इतर चार पाझर तलावांसाठी सुमारे ८० एकर क्षेत्र अधिग्रहण केले आहे.
तलाव नंबर एकमधून सायफन पद्धतीने पाणी इतर चार तलावांना जावे, यासाठी तलाव नंबर एकच्या सांडव्याची उंची लोकवर्गणीतून एक मीटरने वाढवण्यात आली आहे. तलाव जोड प्रकल्पातील अठराशे मीटर लांबीच्या कामातील एक हजार मीटरचे काम पूर्ण झाले असून, आठशे मीटरचे काम शिल्लक आहे. नुकतीच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी भेट दिली. तसेच ‘पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा,’ अशा सूचना दिल्या असल्याची माहिती सरपंच लक्ष्मीबाई भोसले यांनी दिली.
ग्रामस्थांची एकजूट ठरली निर्णायक
वेळू गावाचे रुपडे पालटण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट निर्णायक ठरली. लोकसहभागामुळे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भरघोस काम होऊन गावाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला. लोक सहभागासह शासकीय यंत्रणेचे सहकार्य मोलाचे मिळाल्याने गाव टँकरमुक्त झाले. तलाव जोड प्रकल्पाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढून गावातील विहिरी व बोरला मुबलक पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास वेळू गावच्या सरपंच लक्ष्मीबाई भोसले यांनी व्यक्त केला.