कर्ज मंजुरीच्या बहाण्याने पाच जणांना घातला ६ लाखांचा गंडा, तीन महिलांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:33 PM2022-04-02T17:33:17+5:302022-04-02T17:36:31+5:30
चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देते, असे खोटे सांगून तीन महिलांनी पाच जणांना तब्बल सहा लाखांना गंडा घातला असल्याचे समोर आले.
सातारा : चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देते, असे खोटे सांगून तीन महिलांनी पाच जणांना तब्बल सहा लाखांना गंडा घातला असल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित महिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोमल सनी भिसे (रा. गणेश प्लाझा फेज टू देगाव रोड, एमआयडीसी, सातारा), अनिता पाटील, स्वाती सूरजकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या वरील तिन्ही संशयित महिलांनी चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगून चारुशीला मोहिते यांच्याकडून २ लाख ८२ हजार रुपये घेतले. तर साधना संजय जाधव यांच्याकडून ९७ हजार ४००, योगेश वामनराव भोसले यांच्याकडून ९० हजार ४००, श्रीधर पाटणकर यांच्याकडून १ लाख २० हजार तर उज्वला दत्तात्रय काटकर यांच्याकडून १७ हजार ७०० रुपये असे एकूण ६ लाख ७ हजार ५०० रुपये घेतले.
हे सर्व पैसे गुगल पेद्वारे त्यांना पाठविण्यात आले असल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. चाैधरी हे अधिक तपास करीत आहेत.