विद्यार्थ्याच्या कमरेखालील भाग लुळा
By admin | Published: February 24, 2016 12:30 AM2016-02-24T00:30:58+5:302016-02-24T00:30:58+5:30
जावळी तालुक्यात रुग्णांमध्ये वाढ : दुर्मिळ ‘जीबीएस’ आजाराची लक्षणे; उपचारासाठी पुण्याला हलविले
भुर्इंज : वाई तालुक्यातील पाचवड येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शरीराचा कमरेखालचा भाग लुळा पडायला लागला आहे. त्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या ‘जीबीएस’ आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यावर जिल्ह्णात उपचार होत नसल्याने त्याला पुण्याला हलविण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचवड येथे शिक्षण घेणारा जावळी तालुक्यातील म्हसवे येथील आयुष अभिजित शिर्के (वय १२) या विद्यार्थ्यामध्ये दहा दिवसांपासून ‘ज्युलियन बार सिंड्रोम’ ‘जीबीएस’ची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याच्या कमरेखालील शरीर अचानक कमजोर झाल्याने पालकांनी त्याला वाई येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित रुग्णालयात आजाराचे निदान न झाल्याने आयुषची प्रकृती अधिकच खालावली. आयुषला पुणे येथे ‘केईएम’ रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत बोलताना आयुषचे वडील अभिजित शिर्के म्हणाले, ‘आयुषची प्रकृती गंभीर आहे. हा आजार झाल्यानंतर लगेच निदान झाले असते तर उपचार तातडीने झाले असते.
या आजाराबाबत कोणालाच फारशी माहिती नसल्याने भयावह परिस्थिती उद्भवली आहे. आयुषला दररोज दहा ते पंधरा हजारांची इंजेक्शन द्यावी लागत आहेत. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास त्याला व्हँटिलेटरवर ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.’
दरम्यान, या आजाराची लक्षणे शोधण्यासाठी व या आजाराची माहिती देण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या दुर्मिळ आजाराविषयी माहिती होईल, अशी माहिती भुर्इंज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
अशी आहेत लक्षणे..
श्वसनाचे आजार, जुलाब व उलट्या झाल्यानंतर हातापायाला मुंग्या, बधीर होणे व वेदना जाणवतात. हा आजार शरीरातील रोगप्रतिकारशक्ती नष्ट करतो. बऱ्याचदा या आजाराची सुरुवात पायापासून होते. दोन ते चार आठवड्यांमध्ये पाय लुळे पडायला सुरुवात होते. हृदय आणि फुप्फुसापर्यंत हा आजार पोहोचला तर तो घातक ठरू शकतो. या आजारावर उपचार आहेत; मात्र ते पुणे व मुंबई अशा मोठ्या शहरातच सध्या उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. जंगम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘ज्युलियन बार सिंड्रोम’ असे या आजाराचे पूर्ण नाव आहे. १९१६ मध्ये या आजाराचा रुग्ण सर्वप्रथम इंग्लडमध्ये आढळला होता. गेल्या महिन्याभरात या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण जावळी तालुक्यात अचानकपणे आढळू लागले आहेत.
- डॉ. पी. बी. जंगम, वैद्यकीय अधिकारी, कुडाळ