कार्वे विभागातील शेती पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:57+5:302021-07-24T04:22:57+5:30
कार्वे : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कार्वे परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ...
कार्वे : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कार्वे परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठी भुस्खलनही झाले आहे. कार्वे परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शिवार जलमय झाले असून ओढे, नाले भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने भात, सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.
- चौकट
मळे, कोळणे, पाथरपुंज संपर्कहीन
पाटण तालुक्यातील कोयना विभागातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. येथील नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाथरपुंज व मळे गावातील ग्रामस्थांशी कसलाच संपर्क होत नाही. त्यामुळे प्रशासन चिंतेत असून, विभागात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
- चौकट
टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली
पाटण तालुक्यात गत ४८ तासांपासून तुफान पाऊस पडत असून, पाटण ते टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे टोळेवाडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
- चौकट (फोटो : २३केआरडी०३
राष्ट्रीय महामार्गावर चार फूट पाणी
रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावर पाटणमधील बसस्थानक परिसरात चार फूट पाणी साचले असून, दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. व्यापारी, विक्रेत्यांचे साहित्य पाण्यात भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. तर साचलेल्या पाण्यातून प्रवाशांसह नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. धरणातून सोडलेल्या पाण्याचा परिणाम शहरात दिसू लागला आहे. नवीन बसस्थानक परिसर, कळके चाळ आणि कऱ्हाड-चिपळूण मार्गालगत असणाऱ्या दुकानात शुक्रवारी दुपारी पाणी शिरण्यास सुरुवात झाली.
- चौकट (फोटो : २३केआरडी०४)
मंद्रुळकोळे, खळे, कसणी, मालदनचे पूल पाण्याखाली
सणबूर : ढेबेवाडी ते पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे गावाशेजारील वांग नदीवरील पूल पाण्याखाली आहे. त्यामुळे ढेबेवाडी विभागाचा पाटणशी संपर्क तुटला आहे, तसेच खळे येथील पूलही पाण्याखाली गेल्याने या विभागातील बारा वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे. वाल्मिक पठारावरील कसणी गावाजवळील फरशी पूल पाण्याखाली असल्याने कसणीसह, निगडे, घोटील, माईंगडेवाडी व इतर वाड्या वस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. मालदन व पवारवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला आहे.
- चौकट (फोटो : २३केआरडी०५)
पुराच्या पाण्यात पिके वाहून गेली
कुंभारगाव विभागात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ओढ्याला आलेल्या पुरामुळे तळमावले ते गलमेवाडी मार्गावरील मान्याचीवाडी येथील पूल पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर पातळी नावाच्या ओढ्याला आलेले पुराचे पाणी शेतात घुसल्याने शिवार जलमय होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिके वाहून गेली असून, शिवाजी माने, राजेंद्र माने, संजय माने, शंकर माने, बाबासाहेब माने, तानाजी कुसळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.