सातारा जिल्ह्यातील आठपैकी चार बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

By दीपक देशमुख | Published: May 1, 2023 07:18 PM2023-05-01T19:18:12+5:302023-05-01T19:18:50+5:30

सातारा जिल्ह्यातील नऊ पैकी आठ बाजार समिती यांचा निकाल लागला.

Undisputed dominance of NCP on four out of eight market committees in Satara district | सातारा जिल्ह्यातील आठपैकी चार बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

सातारा जिल्ह्यातील आठपैकी चार बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

googlenewsNext

सातारा: जिल्ह्यातील नऊ पैकी आठ बाजार समिती यांचा निकाल लागला यामध्ये वाई, फलटण, कोरेगाव, लोणंद येथे राष्ट्रवादीने तर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कऱ्हाड बाजार समितीत काँग्रेस पुरस्कृत रयतने बाजी मारली. सातारा बाजार समितीत भाजपने एकहाती यश मिळवले. पाटणला शंभूराज देसाई यांनी सत्तांतर घडवत बाजार समिती ताब्यात घेतली. 

कराडमध्ये रयतला पुन्हा सत्ता
कराड बाजार समितीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्या रयत पॅनेलने  बाजी मारली असून सत्ता कायम ठेवली आहे. रयत पॅनेलने १२ जागा जिंकल्या तर शेतकरी पॅनेलला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

सातारा बाजार समितीत शिवेंद्रराजेच अजिंक्य
सातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ करत सर्व  १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी यांनी पाठींबा देऊनही स्वाभिमानी पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. 

पाटण बाजार समितीत सत्तांतर
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने येथे १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

फलटण बाजार समितीत राजेगटाचेच वर्चस्व
 फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार  रामराजे नाईक निंबाळकर यांचाच करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनल मध्ये असलेल्या सर्व 14 उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. विरोधी गटाचे पूर्ण पॅनल सुद्धा तयार झाले नव्हते, परंतु लढलेल्या काही उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले.

वडूजला सर्वपक्षीय पॅनलची सत्ता
वडुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पँनेल ला ५ जागेवरच समाधान मानावे लागले.

वाई बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
वाई बाजार समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार प्रगती पॅनेलचे अकरा उमेदवार सरासरी ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले तर यापूर्वीच सहा बिनविरोध झाल्या आहेत. विरोधी दीपक ननावरे व विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तनपॅनल ला आर्थिक दुर्बलची एक जागा मिळाली.

कोरेगाव समितीवर घड्याळाचा गजर
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा बाजार समितीवर रोवला आहे. विरोधी कोरेगाव तालुका विकास आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले असून अपक्ष उमेदवाराने एका ठिकाणी विजय मिळवला आहे.

लोणंद समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १७ जागा  जिंकल्या. भाजपा सेना युती पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलने१ जागा मिळवली. 

Web Title: Undisputed dominance of NCP on four out of eight market committees in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.