वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन छेडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:20+5:302021-03-26T04:39:20+5:30
औंध : महावितरणकडून औंधसह परिसरातील गावातील शेतीपंपाची वीजबिल भरली गेली नसल्याने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे रयत ...
औंध : महावितरणकडून औंधसह परिसरातील गावातील शेतीपंपाची वीजबिल भरली गेली नसल्याने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना व शेतकरी यांनी एकत्रितपणे महावितरणला निवेदन दिले असून, वीजजोडणी पूर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
औंध भागात महावितरणने वीज तोडणीची मोहीम हाती घेऊन शेतीची वीज ट्रान्सफॉर्मरवरूनच कट करण्याची यंत्रणा राबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर जगदाळे व औंध, गोपूज, जायगाव, खबालवाडीसह भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महावितरणचे अधिकारी सुभाष घाटोळ यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणे, ट्रान्सफॉर्मर बंद करणे, एकच तास वीज देणे, वसुलीसाठी तगादा लावणे, या गोष्टी महावितरणने तत्काळ थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल अजून वेळेत दिले नाही. अतिवृष्टी, लॉकडाऊन यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत तसेच किमान तीन महिन्यांचे घरगुती बिल माफ करावे आणि तोडलेले वीज कनेक्शन तातडीने जोडावे, दरम्यान याबरोबरच विनामीटर जोडणी आहे. त्याठिकाणी खरा अधिभार तपासून बिले देण्यात यावी. मीटरचे रीडिंग जागेवर तपासून बिले दुरुस्त करून द्यावी, बंद मीटरची सरासरी काढून बिल आकारणी करावी, थकीत बिलावरील संपूर्ण व्याज व दंडाची रक्कम विनाअट रद्द करावी तसेच वीजबिल वसुलीसाठी साखर कारखाने, ग्रामपंचायत, पतसंस्था, सोसायटी यांना देण्याची योजना राबवू नये, अशा प्रमुख मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.