जावळीतील शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:53+5:302021-01-16T04:42:53+5:30
कुडाळ : शेतीपंपांंसाठी नियमित वीजपुरवठा व्हावा, या मागणीसाठी जावळी तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून झगडत होते. या मागणीसाठी ग्रामस्थांकडून ...
कुडाळ : शेतीपंपांंसाठी नियमित वीजपुरवठा व्हावा, या मागणीसाठी जावळी तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून झगडत होते. या मागणीसाठी ग्रामस्थांकडून अनेकदा आंदोलनही करण्यात आले. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना यश आले असून, वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे कमलाकर भोसले यांनी दिली.
जावळी तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा सुरू होता. त्यामुळे भागातील शेतकरी हैराण झाले होते. शेतीपंपांना दिल्या जाणा-या वीजपुरवठ्याच्या वेळेतही दोन तासांची कपात करण्यात आली होती. याबाबत अनेकदा शेतक-यांनी तक्रारी करूनही वीज वितरण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात होते. शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत वीज मंडळाने शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.
शेतकरी संघटनेच्या वतीने वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक करण्यात आले. नवीन कृषी धोरणात देण्यात आलेल्या वीजबिल सवलतीचा फायदा घेण्यासाठी शेतक-यांनी वीजबिल भरणा करावा आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.