अखंड विजेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:27+5:302021-02-16T04:39:27+5:30
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. सकाळ, संध्याकाळी कडाक्याची थंडी तर दिवसभर कडक ऊन पडत ...
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. सकाळ, संध्याकाळी कडाक्याची थंडी तर दिवसभर कडक ऊन पडत आहे. त्यामुळे गहू, हरभरा, लसून, कांदा, बाजीर, मका, ज्वारी या पिकांना पाण्याची गरज भासत असते. त्यासाठी शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
०००००००
स्वस्त धान्याची मागणी
सातारा : सातारा जिल्ह्यातील केशरी रेशनकार्डधारकांना शासनातर्फे मे, जून महिन्यात धान्य दिले जात होते. मात्र ते आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा शासनाने सरसकट केशरी रेशनकार्डधारकांना धान्य स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, तरी दखल घेतली जात नाही.
००००००००
तहसील कार्यालयात गर्दी
सातारा : महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली. त्यामुळे नोकरी तसेच शाळा-महाविद्यालयांत वारंवर गरज भासत असलेल्या विविध शासकीय दाखले काढण्यासाठी तरुणांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील तहसील कार्यालय परिसरात तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
०००००००००
करमणूक बंद
सातारा : साताऱ्यातील नागरिक हौसी आहे. त्यांना कोणत्या कोणत्या कलेची आवड असल्याने नाटक, विविध गाण्यांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. मात्र कोरोनानंतर अनेक ठिकाणच्या उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला. तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांवर परिणाम झाला असून अजूनही बहुतांश ठिकाणी ते बंदच आहेत.
००००००००
केळीचे दर कमी
सातारा : सध्या हंगामी फळे खाल्ल्यामुळे आरोग्याला हितावह ठरते. तसेच साताऱ्याच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून केळीची आवक वाढली आहे. सरासरी चाळीस ते पन्नास रुपये डझन दराने केळीची विक्री सुरू आहे. त्याचप्रमाणे कलिंगड, द्राक्षे, सफरचंद यांनाही मागणी टिकून आहे.
००००००००
चारभिंत परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत असलेल्या चारभिंत परिसरात असंख्य सातारकर दररोज फिरण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी आल्यानंतर अनेक मूलभूत सुविधाही उपलब्ध नाही. येथे कचराकुंडी, पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.
००००००
एटीएममध्ये गैरसोय
वडूज : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. अनेक बँकांमध्ये सुरुवातीला सॅनिटायझर ठेवले जात होते. पण आता केवळ स्टॅण्ड ठेवले जात आहे. अनेक ठिकाणच्या बाटल्या रिकाम्याच असतात.
००००००००
आठवडा बाजारात गर्दी
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडे बाजार भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र अनेकजण कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.
०००००००००
जुंगटीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेट्री : जुंगटी येथील पांडुरंग कोकरे यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. ही माहिती शिवक्रांती हिंदवी सेनेच्या जावळी तालुकाध्यक्ष शिवाजी गोरे यांना समजताच ‘शिवक्रांती’ च्या पथकाने भेट घेऊन त्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले जाईल, असा शब्द दिला होता. त्यानुसार जुंगटी या ठिकाणी जाऊन त्यांना सर्व जीवन उपयोगी साहित्य देण्यात आले.
१५पेट्री
------------
पर्यटक संख्येत घट
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये कोरोनामुळे उशिराने पर्यटकांचा हंगाम सुरू झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत होते. मात्र आता शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. तसेच उद्योग-व्यवसायही सुरू झाले असल्याने पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवतो.
००००००००
बाजारपेठ फुलली
सातारा : शिवजयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शिरवळची बाजारपेठ फुलली आहे. यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी आवश्यक वस्तू, तरुणांचे खास आकर्षण असलेले झेंडे, उपरणे, गळ्यातील ताईत बाजारात उपलब्ध झाले असून, त्यांना मागणी वाढत आहे.