पाण्यात राहून योगासन करण्याची अनोखी कला!
By Admin | Published: June 21, 2017 12:42 AM2017-06-21T00:42:07+5:302017-06-21T00:42:07+5:30
४२ प्रकारात प्राविण्य : साताऱ्यातील सुधीर ससाणे यांचा अचाट प्रयोग
सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शरीर लवचीक बनविण्यासाठी, निरोगी राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आजपर्यंत आपण जमिनीवर व पाण्यावर केले जाणारे योगासनांचे प्रकार पाहिले असतील. मात्र, साताऱ्यातील अॅड. सुधीर ससाणे (वय ५१) यांनी याही पुढे जावून ‘पाण्याखाली’ करावयाच्या योगसानांची अनोखी कला आत्मसाद केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते पाण्याखाली एक नव्हे तर ४२ प्रकारची योगासने करीत आहेत.
जमिनीवर योगासनांचे अनेक प्रकार करता येतात. या योगसनांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. श्वसनावर नियंत्रण ठेवून केल्या जाणाऱ्या योगासनांचे जितके फायदे आहेत, तितकेच फायदे पाण्याखाली केल्या जाणाऱ्या योग प्रकाराचे आहेत. मात्र, पाण्यातील योगासनांचा प्रचार न झाल्याने अनेकजण यापासून अनभिज्ञ आहेत. अॅड. सुधीर ससाणे यांनी आत्मसात केली आहे. ससाणे यांना पूर्वीपासूनच पोहण्याचा छंद आहे. मात्र, पोहण्याबरोबरच आपण काहीतरी वेगळे करावे या विचारातून त्यांना पाण्याखाली योगासन करण्याची संकल्पना सूचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात अवतरली. श्वसनावर नियंत्रण ठेवून त्यांनी पाण्याखाली योगासनास सुरूवात केली. प्रारंभी अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी सराव सुरूच ठेवला.
असा केला जातो योगा
या योगासनांसाठी श्वसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रारंभी पाण्याखाली अधिकाधिक वेळ राहण्याचा सराव करावा. यानंतर शरीराला हवे त्या आसनात वळवावे. आसनाची स्थिती पूर्ण झाल्यावर त्याच स्थितीत काही सेकंद थांबने गरजेचे आहे. आसन पूर्ण झाल्यावर पटकन पाण्यावर येऊन श्वास घ्यावा. शरीराला ताण द्यावा, मात्र अट्टाहासाने जास्त वेळ पाण्याखाली थांबू नये. पाण्याखाली गेल्यानंतर सुमारे २० सेकंद आपण श्वास रोखून योगासनाचा प्रकार करू शकतो. मात्र, यासाठी सरावाची गरज आहे.
सलग तीन वर्षांपासून सराव
अॅड. सुधीर ससाणे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये पाण्याखाली तब्बल ४२ प्रकारची आसने केली असून यामध्ये निपुणता मिळविली आहे. अष्टांगासन, बकासन, भद्रासन, भुजंगासन, अर्धभुजंगासन, चक्रासन, चतुुरंग दंडासन, जानुभालासन, मयुरासन, नमस्कारासन, स्लिपिंग बुद्धा, वृक्षासन, सर्वांगासन आदी आसनांमध्ये ससाणे यांची प्राविण्य मिळविले आहे.
कोणी करावा; करू नये
पाण्याखाली केल्या जाणाऱ्या योगासनांसाठी पोहता येणे जितके गरजेचे आहे, तितकेच मनाची मानसिक तयारी असणेही महत्वाचे आहे. कान, हदय व फुफ्फुसाचा आजार असलेल्या व्यक्तींनी ही योगासने करू नये. ज्यांना हे आजार नाहीत त्या सर्व व्यक्ती पाण्याखालील योगासने करू शकतात.