लक्ष्मणरेषांची सांगलीकरांना अनोखी भेट
By admin | Published: January 27, 2015 10:47 PM2015-01-27T22:47:32+5:302015-01-28T00:55:53+5:30
सत्काराला उपस्थिती : पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणींना मिळाला उजाळा
अंजर अथणीकर - सांगली -ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी पंधरा वर्षांपूर्वी सांगलीला दिलेली भेट पहिली आणि अखेरची ठरली. यावेळी सांगलीकरांसाठी त्यांनी दोन व्यंगचित्रे भेट दिली. ती आजही माजी महापौर सुरेश पाटील यांनी जतन करून ठेवली आहेत. आर. के. लक्ष्मण यांना सांगलीचा नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार देण्याचा निर्णय समितीने घेतल्यानंतर याची माहिती देण्यासाठी समितीचे सदस्य पुण्याला गेले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी समिती सदस्यांच्या आग्रहास्तव पत्नीसह सांगलीला येण्याचे ठरवले. २८ फेब्रुवारी १९९९ रोजी त्यांचा नेमिनाथ भवनमध्ये जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अनेक व्यंगचित्रकारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सभागृहही तुंडूब भरले होते. समारंभानंतर सांगलीकरांनी त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याचा आग्रह केला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून आपण व्यंगचित्रे रेखाटत असून, या ५० वर्षांत ‘कॉमन मॅन’ तारुण्यातून म्हातारा कसा झाला? याचे दर्शन तुम्हाला घडवतो’ असे सांगून त्यांनी कॉमन मॅनचा तारुण्यपूर्व, तरुणपण, प्रौढपण व वृध्द अशी चार व्यंगचित्रे रेखाटली. केवळ पाचच मिनिटात त्यांनी रेखाटलेल्या चित्राला सांगलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
ते दिवसभर सांगलीत होते. सायंकाळी त्यांच्या जेवणाचा बेत आखण्यात आला होता. यावेळी सर्व गोडधोड, मसालेदार पदार्थ टाळून जेवणातील दही-भात त्यांनी आवडीने खाल्ला. हे आपले आवडते जेवण असून, ते चांगले लागल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी सुरेश पाटील यांच्या आईचे आभारही मानले.
गणराय आणि कॉमन मॅन
त्यांनी सांगलीतील आराध्य दैवत कोणते? असा प्रश्न करून त्यांनी दुसरे व्यंगचित्र रेखाटले. यामध्ये त्यांनी गणपती डोळे मिटून बसला असून, कॉमन मॅन (सामान्य माणूस) मात्र उंदराशी चर्चा करीत असल्याचे दाखवले. कार्यक्रमातील दोन्ही व्यंगचित्रांनी सांगलीकरांची मने जिंकली होती.