भैरेवाडीत निघाली अनोखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:02+5:302021-07-11T04:26:02+5:30

चाफळ : लग्न, निवडणुका झाल्या की गावभर मिरवणुका काढल्याचे प्रकार सर्रास आपण पाहात असतो. अशीच पण काहीशी आगळीवेगळी मिरवणूक ...

A unique procession started in Bhairewadi | भैरेवाडीत निघाली अनोखी मिरवणूक

भैरेवाडीत निघाली अनोखी मिरवणूक

Next

चाफळ : लग्न, निवडणुका झाल्या की गावभर मिरवणुका काढल्याचे प्रकार सर्रास आपण पाहात असतो. अशीच पण काहीशी आगळीवेगळी मिरवणूक पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील भैरेवाडी येथे काढण्यात आली. सतरा वर्षे देशाच्या सीमेचे रक्षण करुन स्वगृही परतलेल्या निवृत्त जवान चंद्रकांत कोळेकर यांची ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरुन मिरवणूक काढत या जवानाला आगळीवेगळी सलामी दिली व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

चाफळ विभागातील डेरवण ग्रामपंचायतींतर्गत भैरेवाडी या छोट्याशा गावाचा समावेश आहे. उंच डोंगरकपारीत वसलेल्या या गावची लोकसंख्याही जेमतेम आहे. चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर येथील विद्यार्थ्यांना डोंगरातून कडा उतरुन चार किलोमीटर पायी चालत डेरवण येथे शाळेत यावे लागते. धोकादायक रस्ता, धो-धो पडणारा पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे येथील बहुतांश पालक उच्च शिक्षणासाठी मुलांना शाळेत पाठविण्यास धजावत नाहीत. परंतु, याच गावातील अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या चंद्रकांत आत्माराम कोळेकर यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्यदलात जाण्याचे ठरवले.

आई व वडिलांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न सत्यात उतरवत २००४मध्ये ते सैन्यदलात मराठा लाईट इन्फंट्री (जंगी बटालियन) मध्ये भरती झाले. भरती झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी जम्मू-काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील प्रांतात देशसेवा बजावली. एखादा जवान जेव्हा सैन्यदलात भरती होतो तेव्हा तो सुखरुप परत घरी येईपर्यंत सर्वांच्याच जीवाला घोर लागलेला असतो. चंद्रकांत हे सैन्याची सेवा बजावून सहीसलामत स्वगृही परतले आहेत.

सैन्यदैलात सेवा बजावून व सध्याच्या महाभयंकर कोरोनाच्या विळख्यातून सुटून पहिल्यांदाच गावात एक शूरवीर परतत असल्याचे गावकऱ्यांना समजताच त्यांचा आनंद व्दिगुणित झाला. गावकऱ्यांनी चंद्रकांत यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली. यासाठी त्यांनी चाफळ येथून मिरवणुकीसाठी घोडा मागवला. चंद्रकांत गावच्या प्रवेशव्दारात दाखल होताच त्यांचे औक्षण करत हारतुरे घालून त्याची मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने गावभर मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांतना उपस्थितांनी घरी नेले. चंद्रकांत हे गेली सतरा वर्षे देशाची सेवा करत नाईक पदावरुन निवृत्त झाले आहेत. या अनोख्या मिरवणुकीची चर्चा सध्या चाफळसह संपूर्ण पाटण तालुक्यात रंगू लागली आहे.

फोटो १० चाफळ/जवान

भैरेवाडीतील जवान चंद्रकांत कोळेकर हे निवृत्त झाल्यानंतर चक्क गावातून घोड्यावरुन मिरवणूक काढली. (छाया : हणमंत यादव)

Web Title: A unique procession started in Bhairewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.