अनोख्या उपक्रमांनी दिवाळीत भरली गवरदेवीवाडीची शाळा::लोकमत विशेष
By admin | Published: October 26, 2014 10:25 PM2014-10-26T22:25:12+5:302014-10-26T23:27:06+5:30
पुस्तकांचे वाटप : फटाकेमुक्तीसाठी वाडी-वस्तीवर निघाली रॅली, विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग
प्रवीण जगताप : लिंगनूर :दिवाळी म्हणजे सुट्ट्या, जल्लोष आणि उत्साहात मनसोक्त डुंबण्याचे दिवस..,पण या गोष्टींना फाटा देत मिरज तालुक्यातील गवरदेवीवाडी (बेडग) हे एक छोटेसे गाव. याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा चक्क दिवाळीत भरली. सर्व विद्यार्थी व पालकांच्या सहभागाने सामाजिक व मनोरंजनाचे उपक्रम राबवित दीपोत्सव साजरा केला.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक रवींद्र केंचे यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमांत अग्रेसर असणारी ही शाळा राज्यात परिचित होत आहे. शाळेने दिवाळी सुट्टीस प्रारंभ होताच सर्व पालकांना पत्राद्वारे यंदाची दिवाळी फटाके नव्हे, तर पुस्तकांसोबत साजरी करणार आहोत, असे कळवून शाळेत पालक व मुलांना ‘स्वामी विवेकानंद जीवन आणि उपदेश’ या १०० पुस्तकांचे विद्यार्थी व पालकांना वाटप करण्यात येणार असल्याचे कळविले. त्यानुसार पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे फटाक्यांऐवजी मुले पुस्तकांत रमतील, अशी काळजी घेतली. दिवाळीचा आनंद घेत असताना मुले सुट्टीतील अभ्यास करतीलच, पण दिवाळीचा फराळ तयार करताना त्यांचा सुरक्षित सहभाग करून घ्यावा, असेही सांगितले.
याठिकाणी वाडी-वस्तीवर फटाकेमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची रॅली (फेरी) काढण्यात आली. मुलांनी घरी किल्ले बनविले; पण दिवाळीतला उपक्रम म्हणून शाळेत गुरुजींनी पणत्या आणल्या अन् स्वत:च्या आवडीनिवडीप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी रंगविल्या. तर पालकांसमवेत शुक्रवारी पाडव्यादिवशी सायंकाळी व रात्री शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेच्या व्हरांड्यात व आवारात पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पणत्या लावल्या अन् प्रत्येकाने दीपोत्सवाचा अनोखा आनंद लुटला. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आम्ही शाळेत असताना असे उपक्रम होणे आवश्यक होते, अशा भावना व्यक्त केल्या. या अनोख्या उपक्रमात चंद्रकांत खाडे, सुधाकर राजमाने, राजेंद्र बिंदगे, संजय नागरगोजे, आदिनाथ चोगुले, दशरथ आवटी यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, पालक सहभागी झाले.
फटाकेमुक्त दिवाळीसह पुस्तकांच्या सहवासामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे किमान ५०० रुपये वाचले असतील. फटाक्यांमुळे होणारी संभाव्य इजा टळली. मुलांच्या मनात सामाजिक जाणिवा निर्माण होण्यास मदत झाली. शाळेतल्या कार्यक्रमासाठी माझी मुलगी मामाच्या गावाहून परत आली.
- चंद्रकांत खाडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
माझी शाळा ही भावना मला असे उपक्रम करण्यास प्रेरणा देत असते. मंदिरांमध्ये दिवा लावला जातो. विद्यार्थ्यांच्या सहभागासह दिवाळीत विद्या मंदिरातही आपण हेही एक मंदिरच आहे, या भावनेने व दीपोत्सवाचा आनंद देण्यासाठी असे उपक्रम घेतले. यामध्ये विद्यार्थी व पालक आनंदाने सहभागी झाले.
- रवींद्र केंचे,
शिक्षक, गवरदेवीवाडी.