Satara: अज्ञाताने कारच्या चाकाची नट केले लूज, बांधकाम व्यावसायिक अपघातातून बचावला; गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: August 10, 2023 02:33 PM2023-08-10T14:33:33+5:302023-08-10T14:34:07+5:30
सातारा : कारचा अपघात व्हावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाच्या कारच्या पुढील चाकाचे नट अज्ञाताने लूज केले. अशा अवस्थेत बांधकाम व्यावसायिकाने ...
सातारा : कारचा अपघात व्हावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाच्या कारच्या पुढील चाकाचे नट अज्ञाताने लूज केले. अशा अवस्थेत बांधकाम व्यावसायिकाने कार सात किलोमीटर नेली. मात्र, एका पुलावर कारचे चाक निखळण्याअगोदरच हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे त्यांचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना पाटण येथे घडली. याप्रकरणी अज्ञातावर पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कोळेकर (वय ४३, रा. पेठशिवापूर, ता. पाटण) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये कार उभी असताना अज्ञाताने त्यांच्या कारच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाचे नटबोल्ड लूज केले. मात्र, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. ते कार घेऊन नेहमीप्रमाणे घरातून सकाळी बाहेर पडले. घरापासून पाच ते सात किलोमीटर गेल्यानंतर एका पुलावर आवाज आला म्हणून त्यांनी कार पुलावर थांबवली. त्यावेळी चाकाला चारीही नट नव्हते. चाक निखळून पडण्याच्या बेतात असतानाच हा प्रकार निदर्शनास आला.
या प्रकारानंतर कोळेकर यांनी पाटण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर व्यक्तीगत सुरक्षेला धोका निर्माण करणे (३३६) या कलमान्वये पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हवालदार आर. डी. पगडे हे अधिक तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही तपासणार...
कोळेकर यांच्या घराजवळ ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. या कार्यालयात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या घराकडे रात्रीच्या सुमारास कोणी गेले होते का, हे समोर येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.