एवढे दागिने कशाला घालताय म्हणत वृध्दाला लुटले, अज्ञातावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 04:32 PM2022-01-15T16:32:09+5:302022-01-15T16:32:26+5:30
दुचाकीवरील एक युवक त्यांच्याजवळ आला आणि ''एवढे सोन्याचे दागिने कशाला घालून फिरता. ते रुमालात बांधून देतो,'' असे सांगितले. अन् हातचलाखीने दागिने लंपास केले.
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात चालत निघालेल्या एका वृध्दाकडील ७५ हजारांचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना काल, शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हणमंत गणपती भोसले (वय ७४) हे बाँबे रेस्टॉरंट परिसरातील मोरया हॉस्पिटलजवळ राहतात. शुक्रवार, दि. १४ रोजी सायंकाळी ते चालत निघाले होते. यावेळी दुचाकीवरील एक युवक त्यांच्याजवळ आला आणि ''एवढे सोन्याचे दागिने कशाला घालून फिरता. ते रुमालात बांधून देतो,'' असे सांगितले.
यानुसार भोसले यांनी त्या अज्ञात युवकाकडे सोन्याची चेन, दोन वेढणी, अंगठी असा ७५ हजारांचा ऐवज दिला. तो ऐवज रुमालात बांधण्याचा बहाणा करत युवकाने तो लांबवला. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार शशिकांत भोसले हे करीत आहेत.