अनोळखी महिलांनी शेजारी बसून वृद्धाची २० हजारांची रोकड केली लंपास, साताऱ्यातील घटना
By नितीन काळेल | Published: March 17, 2023 02:13 PM2023-03-17T14:13:05+5:302023-03-17T14:13:31+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाेरी करणाऱ्या महिलांचा शोध सुरु
सातारा : सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात शेजारी बसलेल्या अनोळखी महिलांनी वृद्धाची २० हजारांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी माऊली महादेव गायकवाड (रा. आसनगाव कुमठे, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. १४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास चोरीचा हा प्रकार घडला. राजवाडा बसस्थानकात तक्रारदाराच्या शेजारी दोन अनोळखी महिला बसल्या होत्या.
त्यावेळी तक्रारदाराच्या काळ्या पिशवीतून २० हजारांची रक्कम त्यांनी काढून नेली. ही बाब तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाेरी करणाऱ्या महिलांचा शोध घेत आहेत.