शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:25 PM2019-01-25T13:25:37+5:302019-01-25T13:27:35+5:30
संबंधित गावांनी विविध प्रकल्पांना जमिनी देवून सहकार्य केले आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. खंबाटकीच्या नव्या बोगद्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही. या भूसंपादनावेळी अनेकजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रकल्प महत्त्वाचा आहे, पण शेतकर्यांचे हित पाहणेही महत्त्वाचे आहे. जोपर्यंत शेतकर्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत खंबाटकी बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी तंबीच खा. उदयनराजे भोसले यांनी बैठकीत दिली.
संबंधित गावांनी विविध प्रकल्पांना जमिनी देवून सहकार्य केले आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुढील आठवड्यात 28 किंवा 29 तारखेला बैठक लावली जाईल. या बैठकीस संबंधित अधिकार्यांना बोलावून निर्णय घेतला जाईल. या बैठकीत नक्की मार्ग निघेल, असे आश्वासनही उदयनराजेंनी दिले. न्याय मिळत नाही तोपर्यंत खंबाटकी बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या दालनात खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, पारगाव खंडाळा, वेळे ग्रामस्थांची भूसंपादनासंदर्भात गुरुवारी दुपारी बैठक झाली. त्यावेळी बोलताना उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटींचे गाऱ्हाणे उदयनराजेंसमोर मांडले. नवा खंबाटकी बोगदा होणे आवश्यक असले तरी त्यासाठी होणार्या भूसंपादनात शेतकर्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. जमिनींचे गुंठ्याला दिलेले दर कमी असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे बैठकीतील उपस्थितांनी म्हटले.
खंबाटकी सलग्न बोगदा हा सातारा जिल्ह्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे, परंतु जोपर्यंत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळत नाही तोपर्यंत काम सुरु होवू देणार नाही.https://t.co/o75pF64y08
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 25, 2019