विनामास्क, दुचाकीस्वारांवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:13+5:302021-04-26T04:36:13+5:30
औंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीत औंधसह पुसेसावळी परिसरात नाकाबंदी करून विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात ...
औंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीत औंधसह पुसेसावळी परिसरात नाकाबंदी करून विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये औंध पोलिसांनी या महिनाअखेर तब्बल एक लाख रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्ग वाढू नये यासाठी कडक संचारबंदी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजय बन्सल, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या आदेशानुसार औंधचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे यांचे पथक तैनात केले होते. पोलिसांनी औंध, पुसेसावळी येथील मुख्य चौकात तसेच घाटमाथा येथे नाकाबंदी करून विनामास्क प्रवास करणाऱ्या दोनशे जणांवर तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या तिनशे दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपयेप्रमाणे एक लाख रुपयांचा दंड तसेच दुकान आणि उपाहारगृहे आदी ठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) न राखता गर्दी करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडूनही प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे पाच हजार रुपये असा आज अखेर एक लाख पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोट :
कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. विनाकारण मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार यापुढेदेखील कारवाई करण्यात येईल.
- उत्तमराव भापकर, सहायक पोलीस निरीक्षक, औंध