सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:23 PM2020-11-07T12:23:26+5:302020-11-07T12:24:23+5:30
MuncipaltyCarporation, satara, onlinemeeting सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड पालिकेच्या ऑनलाईन सभेत जाहीर करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येऊन मनोज शेंडे यांचा सत्कार केला.
सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड पालिकेच्या ऑनलाईन सभेत जाहीर करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येऊन मनोज शेंडे यांचा सत्कार केला.
सातारा नगरपालिका निवडणुकीत २०१६ मध्ये सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माधवी कदम या निवडून आल्या होत्या. खा. उदयनराजे भोसले यांनी प्रारंभी राजू भोसले त्यानंतर सुहास राजेभोसले, किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार किशोर शिंदे यांनी माधवी कदम यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
गुरुवारी सकाळी दहा ते बारा नामनिर्देशन पत्र दाखल करणे, दुपारी सव्वाबारा वाजता मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून अर्ज छाननी आणि त्यानंतर दुपारी पावणे एक वाजता पीठासन अधिकारी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली . निवडीनंतर माधवी कदम, किशोर शिंदे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
करंज्यात सहाव्यांदा उपाध्यक्षपद!
करंजे भागातून सातारा पालिकेचे उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी श्रीपतराव पाटील, बाबूराव पाटील, राजू भोसले, अशोक भोसले, बबन यादव यांनी हे पद भूषविले आहे. मनोज शेंडे यांच्या रुपाने सहव्यांदा उपाध्यक्ष पद मिळाले आहे. महादेव भोसले आणि सुजाता भोसले यांनाही याच भागातून नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती.
साताऱ्याचा घनकचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याचे नियोजन करणार आहे. सातारकरांच्या कामांसाठी सतत केबिनमध्ये आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी बांधकाम सभापतिपदी काम केल्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाची माहिती आहे. नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक अधिकारी यांना सोबत घेऊन काम करणार.
- मनोज शेंडे,
उपनगराध्यक्ष, सातारा