‘अतुल’नीय नेतृत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:36 AM2021-03-28T04:36:09+5:302021-03-28T04:36:09+5:30
- हर्षवर्धन मोहिते, बेलवडे बुद्रुक कृष्णाकाठचे नंदनवन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे, सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले (अप्पा). माझे वडील दिवंगत मोहनराव ...
- हर्षवर्धन मोहिते, बेलवडे बुद्रुक
कृष्णाकाठचे नंदनवन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे, सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले (अप्पा). माझे वडील दिवंगत मोहनराव शंकरराव मोहिते यांचा अप्पांबरोबर स्नेहाचा संबंध होता. तो आज आमच्या पिढीतही कायम आहे. असो. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात एक वेगळे कार्य केले आहे. तो वारसा कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनीही जपला. अन् तोच वारसा पुढे नेण्याचे काम तिसऱ्या पिढीतील डॉ. अतुल भोसले समक्षमपणे करीत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतोच.
आजोबांनी निर्माण केलेल्या संस्थांचे जाळे मोठे आहे. तो व्याप सांभाळणेच खरंतर कठीण काम. मात्र, अतुल भोसले यांनी स्वकर्तृत्वावर त्यामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. त्यांनी आजोबांच्याच नावे पहिली आर्थिक संस्था उभारली. २००१ साली त्यांनी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (अप्पा) नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली. त्याच्या सातारा जिल्ह्यात सोळा शाखा कार्यरत आहेत. तर १७९ कोटींच्या ठेवी सभासदांनी विश्वासाने संस्थेत ठेवल्या आहेत. संस्थेची अल्पावधीतील प्रगती कौतुकास्पदच मानावी लागेल.
कृष्णा उद्योग समूहाची महाराष्ट्राला ओळख आहे. यामध्ये डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा फौंडेशन स्थापन करून भर घातली आहे. या फौंडेशनच्या वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर पदवीच्या व्यवस्थापनातील व संगणक क्षेत्रातील शिक्षण दिले जात आहे. आज या संकुलातही प्रवेशासाठी पालकांचा मोठा ओघ आहे.
दरम्यान, ५ फेब्रुवारी २००३ रोजी कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळायला सुरुवात केली. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. ते अध्यक्ष झाले तेव्हा बँकेकडे १०० कोटींच्या ठेवी होत्या. आज त्या साडेसहाशे कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत. त्यांनी अर्थकारणाची नाडी बरोबर ओळखली. आणि काळाबरोबर पाऊले टाकायला सुरुवात केली. मग बँकेत कोअर बँक प्रणाली सुरू झाली. एटीएम सुरू झाले. अशा अनेक सुधारणा त्यांनी घडविल्या. त्याबरोबर शाखाविस्तारही केला. आज बँकेच्या १९ शाखा कार्यरत असून ऑडिट वर्ग अ सातत्याने राखण्यात बँकेला यश मिळाले आहे. ग्राहकांना अथित्यशील सेवा मिळत असल्याने बँक ग्राहकांच्या पसंतीला अधिकच उतरत आहे.
अशा या युवा नेतृत्वाचे कर्तृत्व गत पाच वर्षांत भाजपची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेरले. आणि त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान समितीचे राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्षपद डॉ. अतुल भोसले यांना विश्वासाने दिले. अन् मिळालेल्या कालावधीत त्यांनी नेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणारे उल्लेखनीय कामही केले.
पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सुमारे दोन वर्षे सांभाळली. मात्र, या काळात चांगले कामही करून दाखविले. कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर पहिला प्रश्न आला तो तेथील २६५ कर्मचाऱ्यांच्या कायम नोकरीचा. हे कर्मचारी नोकरीत कायम नसल्याने तुटपुंज्या पगारावर ते कार्यरत होते. डॉ. अतुल भोसले यांनी त्यांना नोकरीत कायम करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांचा विश्वास त्यांनी प्रथम जिंकला. त्यामुळे पुढील काळात काम करणे सुकर होऊन गेले.
तीर्थक्षेत्र पंढरपूरला वर्षातून चार यात्रा भरतात. यातील आषाढ व माघ महिन्यातील यात्रा खूप गर्दीच्या असतात. त्याचा ताण मोठा असतो. तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी डॉ. अतुल भोसले यांनी स्वखर्चाने कऱ्हाड तालुक्यातून सुमारे २ हजार स्वयंसेवक पंढरपूरला नेले व यात्रा व्यवस्थापन चांगले होईल, याची काळजी घेतली. माझ्या मते यापूर्वी कोणत्याही अध्यक्षांनी अशाप्रकारचे नियोजन केलेले नसावे.
पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाचा, प्रतीचा प्रसाद मिळावा, अशी अनेक वर्षांची भाविक भक्तांची मागणी होती. ती लक्षात घेऊन भोसले यांनी पर्यावरणाचे नियम पाळून तुपातील लाडूचा प्रसाद व्यवस्थित पॅकबंद करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आता हा प्रसाद भाविकांसाठी समाधानाची बाब ठरत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल- रखुमाईची मनोभावे सेवा करणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना भविष्यात परमेश्वरही चांगला प्रसाद देईल, असा मला विश्वास वाटतो.
अन् हो... अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधील गावोगावच्या गरीब, गरजू ज्येष्ठांना स्वखर्चाने पंढरपूरची वारी घडवून आणली. त्यांचे आशीर्वादही निश्चितच अतुल भोसलेंच्या पाठीशी राहणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने सुमारे बाराशे भाविक मुक्काम करू शकतील, अशा अत्याधुनिक सोयींनीयुक्त, सुसज्ज भक्त निवासाचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अतुल भोसले अध्यक्ष असतानाच झाले आहे. हा त्यांच्या कामातील एक महत्त्वाचा भाग मानला पाहिजे.
ते राज्यमंत्री असताना कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणली. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाला चालना मिळाली, हे नक्कीच. दिवंगत जयवंतराव भोसले (अप्पा), संयमी नेतृत्व डॉ. सुरेश भोसले यांच्या विचारांचा वसा पुढे घेऊन जाणाऱ्या या युवा नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा..!
(शब्दांकन : प्रमोद सुकरे, कऱ्हाड)