प्रीतिसंगमावर आढळला अप्रकाशित शिलालेख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:13+5:302021-04-18T04:39:13+5:30
हा शिलालेख कृष्णा - कोयनेच्या काठावरील श्री नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर पहावयास मिळतो. मंदिरात प्रवेश करीत असताना सुबक असे ...
हा शिलालेख कृष्णा - कोयनेच्या काठावरील श्री नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर पहावयास मिळतो. मंदिरात प्रवेश करीत असताना सुबक असे दगडी खांब ओलांडून गेल्यानंतर डाव्या बाजूला भिंतीत हा शिलालेख आहे. या शिलालेखाची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे.
इतिहासाचा अभ्यास करीत असताना ऐतिहासिक साधनांच्या स्वरूपात आढळणारे असे अनेक शिलालेख आहेत. ज्यांची माहिती अद्याप अप्रकाशित आहे. याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यात हा शिलालेख आढळला. शिलालेखाच्या पहिल्या ओळींवर रंग लावण्यात आला होता. बाकीच्या ओळी स्पष्ट दिसत होत्या. यावर काही तरी लिहिलेले समजताच याबाबतची माहिती घेतली. असे संकेत फडके यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून कराड व परिसरात ज्येष्ठ इतिहास संशोधक, अभ्यासक के. एन. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही मित्रांच्या सहाय्याने संपूर्ण शिलालेखाचा अभ्यास पूर्ण केला आहे. तेव्हा समजले की या शिलालेखाबाबत कुठेही अद्याप मांडणी करण्यात आलेली नाही. शिलालेखात ज्या मंदिर निर्मितीचा उल्लेख करण्यात आला त्यावरून (१८४७ - १८४८) या काळात पूर्ण झाल्याचे समजते. अशी माहिती संकेत फडके यांनी दिली आहे.
चौकट
शिलालेखात काय आहे
दाजीराव व अपाजी आणि देशपांडे नाडगौडी, कोळे व मरळी इनामदार मौजे कोळेवाडी, बनपुरी, सणबूर रा. कोळेवाडी यांनी गृहस्थाश्रम त्याग केला. तेवीस वर्षात तीर्थयात्रेत, तेवीस वर्षेनंतर सात वर्षे संन्यास घेतला आणि त्रेपन्नावे वर्षी शके १७५३ ला कराड येथे समाधी घेतली. त्यांचा पुत्र नारायणराव यांनी कृष्णाकाठी स्थळ समाधी देऊन देवालयाचे काम चालू केले. शके १७६९ वैशाख कृ ३ दिवशी नारायणेश्वर प्रमुख पंचायतन नाव ठेवून बाण लिंग स्थापना केली.
फोटो :कराड येथे सापडलेला शिलालेख.