मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी
By सचिन काकडे | Published: July 12, 2023 12:36 PM2023-07-12T12:36:44+5:302023-07-12T12:37:42+5:30
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या निर्मितीमुुळे साताऱ्याच्या विकासाची गाडी गतिमान झाली. परंतु महामार्गाच्या खालून गेलेल्या उड्डाणपुलांचा आजतागायत कधीही विकास झाला नाही. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाचा कचरा झाला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरातील उड्डाणपूल कात टाकत असतील तर सातारा शहरात हे का होऊ शकत नाही? असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणी उड्डाणपूल
शेंद्रे, खिंडवाडी, शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, लिंब खिंड
सध्या अशी आहे परिस्थिती
- महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या गावांना जोडण्यासाठी लिंब खिंड ते शेंद्रे या मार्गावर एकूण सात उड्डाणपूल आहेत. एकेकाळी या उड्डाणपुलाखालील जागा प्रशस्त व मोकळी होती.
- प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या जागेवर हळूहळू परप्रांतीय व्यावसायिक, टपरी चालक व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविले. शिवाय अतिक्रमणही फोफावत चालले आहे.
- अलीकडच्या काही वर्षांत उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेची अक्षरश: कचराकुंडी झाली असून, याचे कोणालाही सोयरसूतक नसल्याचे दिसते.
काय करता येईल..
जिल्हा व पालिका प्रशासनाने प्रयत्न केल्यास महामार्गावरील सर्वच उड्डाणपूल कात टाकू शकतात. जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, कास पठार, फुले आदींची चित्रे उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटता येऊ शकतात. वृद्धांसाठी ओपन जीम, उद्यान तसेच वाहनतळही विकसित करता येऊ शकते.
असे पालटले रूप..
मुंबई महापालिकेकडून माटुंगा येथील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उड्डाणपुुलांच्या पिलर्सवर पक्षी, निसर्ग, धबधबे व विविधरंगी फुलांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सुशोभीकरणामुळे उड्डाणपूल प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. पुण्यातील चांदणी चौकातील भुयारी मार्गातही असाच प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, जिल्हा व पालिका प्रशासनाने मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल.
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करायलाच हवा. उड्डाणपुलांचे सुशोभीकरण झाले तर निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल. ही जागा अतिक्रमणांनी गिळंंकृत करण्यापूर्वी प्रशासनाने सुशोभीकरणाचे काम हाती घ्यायला हवे. - श्रीरंग काटेकर, सातारा