नाईट सफारीची धूम! माणसं जंगलात तर प्राणी घरात; अशास्त्रीय पद्धतीने पर्यटन वाढीचा प्रस्ताव घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:13 PM2022-04-20T14:13:53+5:302022-04-20T14:25:03+5:30

Satara News : रात्रीच्या अंधारात प्राण्यांना बघायला माणसं जंगलात जातील तेव्हा माणसांच्या भीतीने प्राणी गावात घुसण्याची शक्यता वन्यजीवतज्ञ व्यक्त करत आहेत. अशास्त्रीय पद्धतीने पर्यटन वाढीचा प्रस्ताव हा सर्वांसाठीच घातक ठरणारा आहे.

Unscientific proposal to increase tourism is dangerous Night safari in satara | नाईट सफारीची धूम! माणसं जंगलात तर प्राणी घरात; अशास्त्रीय पद्धतीने पर्यटन वाढीचा प्रस्ताव घातक

प्रातिनिधिक फोटो (सोशल मीडिया)

googlenewsNext

प्रगती जाधव पाटील

सातारा - पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने संयुक्त वनव्यवस्थापन समितीने ‘जंगल नाईट सफारी’चा प्रयोग राबविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली आहे. रात्रीच्या अंधारात प्राण्यांना बघायला माणसं जंगलात जातील तेव्हा माणसांच्या भीतीने प्राणी गावात घुसण्याची शक्यता वन्यजीवतज्ञ व्यक्त करत आहेत. अशास्त्रीय पद्धतीने पर्यटन वाढीचा प्रस्ताव हा सर्वांसाठीच घातक ठरणारा आहे.

पर्यटकांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भुरळ पडते मात्र हे पर्यटन बारमाही चालावे या उद्देशाने कासला नाईट सफारीचे प्रयोजन करण्यात आले. हे प्रयोजन करताना प्राणी वर्तनशास्त्राचा अभ्यास कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राण्यांच्या वावर क्षेत्रात पर्यटकांना फिरवणे हे प्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा आणणारे आहे. मात्र, प्राण्यांपेक्षा पर्यटन वृद्धि हाच वनविभागाचा महत्त्वपूर्ण उद्देश असल्यासारखे वनविभाग टोकाचा विरोध असतानाही याकडे लक्ष पुरवीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पावसात सरपटणाऱ्या जीवांचा खेळ खल्लास

वनविभागाने कास व महाबळेश्वर वनक्षेत्रात नाईट सफारीचा संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या आडून घातलेला घाट सरपटणाºया प्राण्यांनाही घातक ठरणार आहे. रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्या या प्राण्यांना आधीच हॉटेलिंग करून परतणाऱ्या गाड्यांच्या चाकाखाली आपले आयुष्य गमवावे लागले होते. नाईट सफारीची धूम वाढली तर या प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण निश्चित वाढणार आहे.

टुरिझम लॉबीच्या दबावाखाली घेतलेला निर्णय

कास परिसरात नाईट सफारीच्या नियोजनासाठी टुरिझम लॉबी सक्रिय झाल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. केवळ या लॉबीच्या आग्रहाखातर या सफारीचे नियोजन करण्यात येत आहे. आर्थिक फायदा शिवाय ज्यांना पर्यावरणाची काडीमात्र घेणे देणे नाही अशा लोकांनी अशास्त्रीय पद्धतीने सुरू करायला लावलेली ही सफारी पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम करणाºया वनविभागाला ही गोत्यात आणणारी ठरणार आहे.

‘डे’ सफारीचा पर्याय उत्तम

कास पठारावर जैवविविधतेचे रक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाकडे आहे. मात्र या समृद्धतेची जपणूक करण्यापेक्षा त्यांची वाताहत करण्याकडे वनविभागाचा कल दिसत आहे. पर्यटन वाढीसाठी नाईट सफारी करण्यापेक्षा डे सफारी हा पर्याय संयुक्तिक ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे वनविभागासह वनव्यवस्थापन समितीने याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

वनविभागाने वनव्यवस्थापन समितीच्या आडून घेतलेल्या या निर्णयाने वन्य प्राण्यांचे नुकसान आणि त्यांच्या वावरावर बंधन येणार आहे. जंगल सफारीचा निर्णय घेण्यापूर्वी याबाबत कोणाशीही जाहीरपणे चर्चा न करता परस्पर निर्णय घेण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. नाईट सफारी ऐवजी दिवसा पर्यटकांना फिरविण्याचा पर्याय विचाराधीन ठेवावा. वेळीच नाईट सफारीला लगाम घालणे हे शहाणपणाचे ठरणारे आहे.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा

Web Title: Unscientific proposal to increase tourism is dangerous Night safari in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.