हुडहुडीची थंडी नाहीच; साताऱ्यात पुन्हा अवकाळी ढग, शेतकरी चिंतेत
By नितीन काळेल | Published: December 6, 2023 04:59 PM2023-12-06T16:59:24+5:302023-12-06T17:01:01+5:30
महिन्यात दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपले
सातारा : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आलातरी किमान तापमान कायम १५ अंशावर राहत आहे. यामुळे जिल्हावासियांसाठी हुडहुडीची थंडी नाहीच. त्याचबरोबर महिन्यात दोनवेळा अवकाळी पाऊस झाला असून कायम ढगाळ वातावरण राहत आहे. परिणामी शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिना उजाडताच थंडीला सुरुवात होते. हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत जाते. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पारा १० ते १२ अंशापर्यंंत खाली येतो. तसेच डिसेंबर महिन्यातही थंडीची लाट राहते. सलग आठ-आठ दिवस हुडहुडी भरविणारी थंडी असते. पण, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच थंडीच्याबाबतही झाले आहे. डिसेंबर महिना सुरू होऊन सहा दिवस झालेतरी थंडीची तीव्रता कमी जाणवत आहे. यामुळे जिल्हावासीय थंडीपासून दूरच आहेत.
त्यातच जिल्ह्यातील मागील एक महिन्याच्या काळात अवकाळीचा पाऊस दोनवेळा पडला आहे. यामुळे पिकांचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांत काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
मागील १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. याचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना झाला. पण, सातारा आणि जावळी तालुक्यात भात आणि ज्वारी पिकाचेही नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला होता. अवकाळीत पिकाचे नुकसान कमी झाले असलेतरी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता कायम आहे. कारण, द्राक्ष, डाळिंबसारख्या फळबागांवर रोगाचा प्रादूर्भावक होण्याचा धाेका असतो. तसेच भाजीपाल्यावरही त्याचा परिणाम होत असल्याने रासायनिक आैषधांची फवारणी करावी लागते. या कारणाने उत्पादनावरही परिणाम होत असतो. आताही अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे.
सातारा शहरात नोंद किमान तापमान..
दि. २० नोव्हेंबर १९.६, २१ नोव्हेंबर १८, २२ नोव्हेंबर १६.५, २३ नोव्हेंबर १८, २४ नोव्हेंबर १६.७, दि. २५ नोव्हेंबर २०.५, २६ नोव्हेंबर १८.१, २७ नोव्हेंबर १९.९, २८ नोव्हेंबर २१.१, २९ नोव्हेंबर १७.५, ३० नोव्हेंबर १९.६, दि. १ डिसेंबर २०.१, २ डिसेंबर १८.९, ३ डिसेंबर १८, ४ डिसेंबर १८.२, ५ डिसेंबर १७.५ आणि दि. ६ डिसेंबर १९.४