साताऱ्याला अवकाळी पावसानं झोडपले; पिकाला फायदा, फळबागांना फटका
By नितीन काळेल | Published: November 25, 2023 08:58 PM2023-11-25T20:58:56+5:302023-11-25T20:59:51+5:30
या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा शहराला तर रात्री साडे आठच्या सुमारास झोडपले. यामुळे रस्त्यावर सामसूम निर्माण झाली होती. तर या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.
नाेव्हेंबर महिना संपत आलातरी अजुनही थंडीला जोर नाही. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला. हा अंदाज जिल्ह्यात खरा होताना दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहर आणि परिसरात रात्री साडे आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १० मिनीटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तसेच रहदारीही कमी झाली होती. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले.
दरम्यान, जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. तर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होणार आहे. पण, फळबागांना फटका बसू शकतो. कारण, अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा पक्व अवस्थेत आहेत. अशात गारपिट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.